Type Here to Get Search Results !

माध्यमांचं वृत्तांकन करू शकते आत्महत्या थांबवण्यासाठी सकारात्मक परिणाम

लातूर येथील एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या बातम्यांची भरती ओसरतानाच सोलापूरमधील अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांच्या अगदी त्याच प्रकारच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे.

आत्महत्यांचे वृत्तांकन हा संवेदनशील आणि जबाबदारीचा विषय आहे. याबाबत सर्व माध्यमांनी योग्य दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे, कारण अशा वृत्तांकनामुळे समाजावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात, विशेषतः असुरक्षित व्यक्तींवर... !

जेव्हा माध्यमे आत्महत्येचे वृत्तांकन करतात, तेव्हा त्यांच्या शब्दांची, मांडणीची आणि वृत्त शैलीची मोठी जबाबदारी असते. कारण चुकीचे, सनसनाटी आणि नाट्यमय वृत्तांकन अनेकदा “आत्महत्या अनुकरण” (copycat suicides) ला कारणीभूत ठरू शकते.

Werther Effect (गोएथेच्या कादंबरीवर आधारित): या संकल्पनेनुसार प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्महत्यांचे विस्तृत वृत्तांकन केल्यास लोक त्या आत्महत्येची नक्कल करू शकतात.

संवेदनशील तपशीलांचा अतिरेक: आत्महत्येची पद्धत, ठिकाण, किंवा वैयक्तिक तपशील (उदा., सुसाइड नोट) यांचे सविस्तर वर्णन करणे धोकादायक ठरू शकते. यामुळे कॉपीकॅट आत्महत्या वाढण्याची शक्यता असते.

आत्महत्येला ‘नायकत्व’ किंवा ‘रोमँटिक’ स्वरूप देणे, विशेषतः सेलिब्रिटींच्या बाबतीत, तरुणांवर चुकीचा प्रभाव पाडू शकते.

माध्यमांनी आत्महत्यांचे वृत्तांकन करताना जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अपेक्षित आहे.

काय सांगतात प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ची मार्गदर्शक तत्वे?

1. संवेदनशीलता: आत्महत्येच्या बातम्या सनसनाटीपणे मांडू नयेत. तपशील कमी ठेवावेत आणि आत्महत्येची पद्धत उघड करू नये.

2. प्रतिबंधक माहिती: आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन क्रमांक 

उदा., भारतात टेलेमानस  हेल्पलाइन: 14416

आणि मानसिक आरोग्य संसाधनांची माहिती बातम्यांमध्ये समाविष्ट करावी.

3. शैक्षणिक दृष्टिकोन: आत्महत्येच्या मागील कारणे (उदा., मानसिक आजार, सामाजिक दबाव) याबद्दल माहिती देऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.

4. आत्महत्येच्या ठिकाणाचे फोटो,  व्हिडीओ आणि सुसाईड नोट ची प्रसिद्धी टाळावी.

माध्यमांनी अशा घटनांचे वृत्तांकन करताना आत्महत्या टाळण्यासाठीच्या उपाययोजना, समुपदेशन, संघर्षातून बाहेर पडलेल्यांच्या कहाण्या दाखवल्या, तर ते आत्महत्यांना थांबवण्यासाठी सकारात्मक परिणाम करू शकतात. हा माध्यमांचा सकारात्मक परीणाम Papageno Effect या नावाने ओळखला जातो. 

डॉ. नितीन चाटे.

(शेअरिंग : प्रा. के.जी सुरवसे.)