श्रीक्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर) : भारत हा कृषिप्रधान देश आहे, असा नारा सगळेच देतात, पण शेतकऱ्यांचे दुखणे काय आहे, त्याला लागणारी वीज वेळेत मिळते का ?त्याला शेतीला लागणारे पाणी मिळते का? बऱ्याच शेतकऱ्यांची मुले सत्तेत आहेत. ते शेतकऱ्यांचा विचार करतात का? याचे उत्तर नकारात्मक मिळते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणूक करणारे राज्यकर्ते निर्माण होणे आवश्यक आहे. असे विचार निवृत्त विस्तार अधिकारी शिवलिंगप्पा वंगे यांनी श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालय आयोजित व्याख्यानमालेत मांडले.
याप्रसंगी इंद्रजित भालेराव यांच्या 'गावाकडं चल, माझ्या दोस्ता' या कवितेचा सारांश सांगून शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन घडविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री रामलिंगेश्वर प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार म्हणाले की, शेतकऱ्यांना काही देतांना खूप चर्चा केली जाते. पण राज्यकर्त्यांना सोयी-सवलती देतांना चर्चा न करता मंजुरी देण्यात येते, ही बाब दुर्दैवी आहे. यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. अशा बाबतीत चर्चा करणे व प्रबोधन करणे हा व्याख्यान मालेचा हेतू असल्याचं प्रास्ताविकात सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना श्रीशैल धनशेट्टी यांनी शेतकरी एकजूट झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास विश्वनाथ पावले, प्रभुलिंग शेळगे, बसवराज कुर्ले, शरणप्पा कोळी, नागनाथ शेळगे, संगप्पा उदंडे, श्रीशैल चितले, अजित पट्टणशेट्टी,अक्कन बळग भगिनी व श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष फताटे यांनी केले.