सोलापूर : राष्ट्रयोगी तपस्वी संत प. पू. आचार्य स्वामी श्रीगोविंन्ददेव गिरीजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गीता परिवार या जागतिक संघटनेकडून सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिंना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाते. यंदाच्या पुरस्कारासाठी ह. भ. प. निलेश महाराज झरेगांवकर यांची निवड करण्यात आलीय.
गीता परिवार हे राष्ट्रीय संघटन जगातील १८५ पेक्षा अधिक देशात श्रीमद् भागवत गीतेच्या मोफत प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत आहे.
गीता परिवार चे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी मालपाणी या पुरस्कार वितरणासंदर्भातील पुढिल माहिती लवकरच जाहिर करतील, गौरवपत्र सन्मानचिन्ह व धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय पुरस्कार कीर्तनकार झरेगांवकर महाराज यांना प्रदान करण्यात येईल, अशी माहिती वारकरी आचारसंहिता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख संजयजी कोटणीस यांनी कळविली आहे.
ह. भ. प. निलेश महाराज झरेगांवकर यांनी महाराष्ट्रातील ४७ हजार कैद्यांचे पालकत्व स्विकारून त्यांना समाजांच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्याकरिता केलेले सुधारणा व पुनर्वसनाचे कार्य उल्लेखनीय असून महाराजांचे हे राष्ट्रकार्य निरंतर सुरू आहे, याची दखल घेऊन स्वतः स्वामी श्रीगोविंन्ददेव गिरीजी महाराज यांनी या पुरस्काराची घोषणा केल्याचं माध्यमांना कळविण्यात आलंय.
