सोलापूर : येथील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर (वय-६९ वर्षे) यांनी शुक्रवारी रात्री राहत्या स्वतःवर गोळ्या झाडल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सोनामाता शाळेशेजारील निवासस्थानी शनिवारी, सकाळी ११ वाजल्यापासून ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता मोदी स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
जुन्या पिढीतील निष्णात मेंदूरोग तज्ज्ञ अशी ओळख
डॉ. वळसंगकर यांची जुन्या पिढीतील निष्णांत मेंदूरोगतज्ज्ञ अशी ओळख होती. ते न्यूरो फिशियन होते. उपचारासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील रुग्णांच्या उपचारासाठी ते जात होते. त्यांचा आदर्श घेऊन अनेक डॉक्टरांनी स्वतःचे दवाखाने थाटले आहेत. रामवाडी परिसरात एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस नावाने मोठा डोलारा उभा केला.
अल्प परिचय :
लंडनमध्ये झाले होते शिक्षण
डॉ. शिरीष वळसंगकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेजमध्ये झाले. डॉ. व्ही.एम. मेडिकल महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते.
शिवाजी विद्यापीठ व लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी, एमआरसीपी पदवी घेतली. देशभरातील नामांकित मेंदू विकारतज्ज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता.
कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपी न्यूरो हॉस्पिटल आहे. १९९९ मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले.
न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते. मेंदू विकार संदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत.
कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डूवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्ही.एम. मोडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले.
बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेतले. जागतिकस्तरावर त्यांचे शोध निबंध सादर झाले होते.