सोलापूर : नोंदणी दस्तामध्ये परस्पर बदल करुन त्याचं बनावटीकरण करुन पुण्याच्या ठकसेनांनी जवळपास ०५ कोटी रूपयांची फसवणूक केलीय. हा प्रकार दुय्यम निबंधक उत्तर-२, सोलापूर यांच्या कार्यालयात १६ मार्च रोजी घडला. या प्रकरणात फसवणूक झालेल्या अनुक्रमे रघुनाथ आनंदा रोकडे, संदिप गोविंद रोकडे यांच्या फिर्यादीनुसार राहुल विष्णु लाड आणि राजेंद्र तुकाराम थोरवे या आरोपींविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, निगडी प्राधिकरण सेक्टर २ सोलापूर यांचे कार्यालय येथील रहिवासी रघुनाथ आनंदा रोकडे (वय-४५ वर्षे) आणि सांगली जिल्ह्यातील बहे वळवा येथील संदिप गोविंद रोकडे (वय-४५ वर्षे) यांनी दुय्यम निबंधक उत्तर-२, सोलापूर यांच्या कार्यालयात १६ मार्च २०२५ रोजी नोंदणी खरेदी दस्त क्रं. २१३७/२०२५ आणि नोंदणी खरेदी दस्त क्रं. २१३८/२०२५ नुसार केले होते.
त्या दोन्ही दस्तामधील पान क्रं. ७ मध्ये परस्पर बदल करुन खोटा बनावट मजकुर समाविष्ट करुन त्या दस्ताचे राहुल विष्णु लाड (रा. सर्व्हे नं. ११६, रिलायन्स टॉवर जवळ, वाल्हेरवाडी, चिंचवड पुणे) आणि राजेंद्र तुकाराम थोरवे, (रा. सर्व्हे नं. १८/९, गणेश नगर, दुर्गा कॉलनी, डांगे चौक, थेरगाव, पुणे) यांनी बनावटीकरण केले.
त्या आडून रघुनाथ आनंदा रोकडे यांची २ कोटी ०५ लाख रुपये तर संदिप गोविंद रोकडे यांची २ कोटी ९३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केलीय. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यावर सदर बझार पोलिसांकडं नोंदणी खरेदी दस्त क्रं. २१३७/२०२५ संदर्भात भा. न्याय संहिता कलम ३१८ (१), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३(५) प्रमाणे तर नोंदणी खरेदी दस्त क्रं. २१३८/२०२५ संदर्भात भा. न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६(२), ३३६(३), ३३८,३४०(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. खरेदी दस्तात असलेल्या अटींच पालन झालं नसल्याचं रोकडेंचं म्हणणं आहे. सपोनि पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
