सोलापूर : नामवंत विधीज्ञांच्या स्मृति जागविल्याने त्यातून युवा पिढीला प्रेरणा मिळते. वकीलांनी क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत, कनिष्ठ वकील व ज्येष्ठ वकील त्या निमित्ताने एकत्र येऊन खेळल्याने उभमतांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होण्यास मदत होते, असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
शिवछत्रपती रंगभवन येथे माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर यांच्या संकल्पनेतून विधीगंध संस्था व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उद्घाटन व नामवंत विधिज्ञाच्या स्मृतीप्रित्यर्थ विधीगंध पुरस्कार सोहळा पार पडला. त्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे बोलत होते.
विधीगंध चषक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघ मिळून एकूण 20 संघ सहभागी झालेले आहे. याप्रसंगी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व विधीगंध पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कै. तात्यासाहेब नेर्लेकर स्मृति विधीगंध पुरस्कार ॲड. वसंतराव भादुले (पंढरपूर) यांना, त्यांनी आपल्या वकीलपदाच्या कार्यकाळात दिवाणी व फौजदारी क्षेत्रात भूमिका निभावल्याबद्दल देण्यात आला. कै ए. तु. माने यांच्या स्मृति प्रित्यर्थ विधीगंध पुरस्कार अॅड. डी. एन. काळे (माळशिरस) यांना देण्यात आला. कै. ए. डी. ठोकडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ अॅड.बापू करंजकर यांना आपल्या वकिलीत केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल पुरस्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. यावेळी नूतन न्यायाधीश अनिता हवालदार व मुनजरीन जेलर तसेच सर्व तालुका बारचे अध्यक्षांचा सत्कार सुशीलकुमार शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.
नविन पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा, म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ यांचा पुरस्कार सोहळा व खेळातून खिलाडूवृत्ती वाढावी, यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलं असल्याचे प्रतिपादन अॅड. संतोष न्हावकर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी कै. अशोक ठोकडे व कै. तात्यासाहेब नेर्लेकर यांच्या विविध आठवणी सांगून स्मृती जागवल्या.
याप्रसंगी क्रिकेट स्पर्धेच्या टी-शर्ट चे अनावरण करण्यात आले. सुशीलकुमार शिंदे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पहिल्या सामन्याची नाणेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघास कै. ॲड. व्ही. डी. फताटे यांच्या स्मृति प्रित्यर्थ विजेता चषक देण्यात येणार आहे. उपविजेता संघास कै. ॲड जयकुमार काकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उपविजेता चषक, तसेच मॅन ऑफ द सिरीज चषक कै. ॲड. आर. जी. देशपांडे यांचे स्मृति पित्यर्थ व बेस्ट बॅट्समन चषक कै. ॲड जी. एस. आडम यांचे स्मृति प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज चषक कै. ॲड रमेश कणबसकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे.
या प्रसंगी विधीगंध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संतोष न्हावकर, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. पी. शिंदे, ज्येष्ठ वकील धनंजय उर्फ अबासाहेब माने, झहीर सगरी, मनोज पामुल, निदा सैफन, विनय कटारे हे उपस्थित होते. सोबतच संपूर्ण जिल्ह्यातून आलेले वकील खेळाडू, ज्येष्ठ व कनिष्ठ वकील बंधू-भगिनी मोठ्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा गव्हाणे यांनी तर आभार अॅड. मंजुनाथ ककलमेली यांनी मानले.
