कवी माधव पवार यांच्या ‘गरुडभरारी’ काव्यसंग्रहाचे बुधवारी प्रकाशन

shivrajya patra

सोलापूर : येथील कविवर्य रा. ना. पवार प्रतिष्ठान आणि शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर यांच्या वतीने ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या ‘गरुडभरारी’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ बुधवार, दि.९ एप्रिल २०२५  रोजी सायंकाळी ५-३० वा. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृह (अ‍ॅम्फी थिएटर) येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कविवर्य रा. ना. पवार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगांवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘गरुडभरारी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून पद्मश्री नारायण सुर्वे कला व साहित्य अकादमी, पुणेचे अध्यक्ष कृषीभूषण सुदाम भोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.  ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. सुहास पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या काव्यसंग्रहास प्रख्यात कवी फ.मुं. शिंदे यांनी पाठराखण केली आहे. शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.

सोलापूर येथे २००६ साली झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय साहित्य समेेलनाचे स्वागत गीत माधव पवार यांनी लिहिले असून कवी पवार यांनी आत्तापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसह अनेक साहित्य संमेलनांत आपल्या बहारदार शैलीत कवितांचे सादरीकरण केले आहे. त्यांचा ‘हे शुभ शकुनांचे पक्षी’ हा काव्यसंग्रह यापूर्वी प्रकाशित झाला असून त्याला  अनेक राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 

कवी माधव पवार यांनी लिहिलेल्या गीतांचे गायन सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, स्वप्निल बांदोडकर, शकुंतला जाधव, सुरेख पुणेकर, बेला सुलाखे, प्रशांत देशपांडे, सुहास सदाफुले, माधुरी करमकर, विजय सरतापे, जगदीश गोरसे या मान्यवर गायकांनी गायन केलं आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या प्रकाशन समारंभास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत येळेगांवकर यांनी केले आहे. 

या पत्रकार परिषदेला कवी माधव पवार, शिवप्रज्ञा प्रकाशनचे प्रकाशक व ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी उपस्थित होते.

---------

राजेंद्र भोसले,

शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर.

मो. 9881786466

To Top