Type Here to Get Search Results !

पोलीस हवालदार आसिफ मुजावर यांचं निधन; पोलीस दलातर्फे हवेत फैरी झाडून मानवंदना


सोलापूर : येथील पोलीस आयुक्तालय अंतर्गत जेलरोड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार आसिफ महेबूब मुजावर यांचं अल्पशः आजाराने रविवारी रात्री निधन झाले. ते मृत्यूसमयी ४१ वर्षीय होते. त्यांना दफनविधीपूर्वी कब्रस्तान मध्ये शहर पोलीस दलातर्फे तीन वेळा हवेत फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

सोमवारी सकाळी लक्ष्मीनारायण थिएटरनजिकच्या आदर्श नगरातील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. त्यांचा दफनविधी (सुपूर्द-ए-खाक) अक्कलकोट रोड येथील जडेसाब मुस्लिम कब्रस्तान येथे करण्यात आला. 

यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच पोलीस दलातील सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आसिफ मुजावर हे मार्च 2003 साली शहर पोलीस दलात भरती झाले होते. पोलीस दलातर्फे भरविण्यात आलेल्या  जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी 100 मीटर धावणे, लांब उडी, ट्रिपल जंप अशा क्रिडा प्रकारात अनेक पारितोषिके प्राप्त केली होती.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भावंडं असा परिवार आहे. ते सर्वांशी हसतमुख व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.