सोलापूर : प्लॉट खरेदीसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेच्या मागे तगादा लावूनही मागणी पूर्ण न झाल्याने ' तलाक. तलाक.. तलाक... ' म्हणत तिला माहेरी हाकलून देण्यात आलंय. ही घटना सोलापुरात ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२४ दरम्यान घडलीय. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हल्ली तेलंगी पेठेत माहेरी वास्तव्यास असलेली सौ. तनजीला सासरी नांदत असताना पती अहमदअली लियाकतअली पठाण आणि त्याच्या कुटुंबीयांनी माहेरी वडीलांकडून प्लॉट घेवून दे किंवा प्लॉट साठी पैसे आण म्हणून तिचा वेळोवेळी मारहाण-शिवीगाळ करून छळ सुरु केला. दरम्यान उपाशीपोटी ठेऊन व शिळे अन्न खाण्यास घालून शारीरीक आणि मानसिक छळ केला..jpeg)
दरम्यान जानेवारी २०२४ मध्ये आजारी असताना सासरच्या मंडळींनी संगनमताने सौ. तनजीला ला उपचारास घेऊन न जाता तुझ्यावर उपचार करणार नाही, असं ठासून सांगितले. त्यापुढं जाऊन सासू अक्तरबानो हिनं सून सौ. तनजीला च्या वडीलांना बोलावून घेतले. त्यावेळी अहमदअली लियाकतअली पठाण यांने तुमची मुलगी घेऊन जावा, असे सांगून तीन वेळा तलाक... तलाक... तलाक... असे बोलून तोंडी तलाक देत घरातून हाकलून दिले.
याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार अहमदअली (पती), लियाकतअली (सासरे), अक्तरबानो (सासू), आयशा शेख (नणंद), अलमास खान (नणंद) अनिकुनीसा शेख (नणंद) आणि अतिकुनिसा अलीम (नणंद, सर्व रा-सोलापूर) यांच्याविरुद्ध भादवि ४९८ (अ), ३२३,५०४,५०६,३४, सह मुस्लीम महिला कायदा कलम ४ प्रमाणे सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. पोलीस हवालदार खुने या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
