पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ : वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसाच्या आत प्रस्ताव तयार करणे आणि पुढील कार्यवाही करण्याचे आदेश
विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा प्रस्ताव सादर करा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम आणि विद्यापीठ इमारत 15 मे पर्यंत पूर्ण होणार
मुंबई / 08 एप्रिल : सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या संदर्भातील प्रश्नांसंदर्भात आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक विधान भवन, मुंबई येथे होऊन त्यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
विद्यापीठ क्षेत्राच्या चारही बाजूस वनविभागाचे आरक्षण असल्याने येण्या-जाण्यासाठी रस्ता बांधण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी येत्या आठ दिवसात वनविभाग, महसूल आणि विद्यापीठ अधिकारी यांच्याशी समन्वयातून कार्य अहवाल तयार करावा.

बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्यासह तीनही विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.