Type Here to Get Search Results !

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निशांत सावळे

सोलापूर : शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निशांत सावळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिवपुत्र संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुरारजी पेठ येथील हिंदवी स्वराज्य भवनात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 

प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयघोष करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. या निमित्ताने मध्यवर्ती महामंडळाच्या अधिपत्याखाली मिरवणुका निघणार आहेत. सोलापूर शहरातील मंडळांना येणाऱ्या अडचणीसंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली.

पारंपारिक वाद्य आणि डॉल्बी संदर्भात प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मंडळाला येणाऱ्या अडचणीसंदर्भात संपर्क साधण्याचे आवाहन शिवपुत्र संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांनी केलं आहे.

अठरापगड जातींना सोबत घेऊन सोलापुरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या माध्यमातून संभाजी महाराजांचे कर्तृत्व आणि विचार पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

सोलापुरातील मंडळांनी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना संभाजी महाराजांच्या इतिहासाला चित्र आणि देखाव्याच्या माध्यमातून प्राधान्य द्यावं, असं आवाहन नूतन उत्सव अध्यक्ष निशांत सावळे यांनी केले आहे.

 यावेळी, कार्याध्यक्षपदी वीरेश कलशेट्टी आणि उपाध्यक्षपदी सागर गायकवाड आणि सॅम पतंगे यांचीही निवड करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त राजाभाऊ गेजगे, पवन आलुरे, हरिभाऊ सावंत, नागेश भोसले आणि राहुल दहीहंडे उपस्थित होते.