बंद अवस्थेतील जलतरण तलाव सुरू करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचं मनपा आयुक्तांना निवेदन

shivrajya patra

सोलापूर : शहरात मार्कंडेय जलतरण तलाव, सावरकर जलतरण तलाव आणि विजापूर रोडवरील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आहेत. सध्या सावरकर जलतरण तलाव काही प्रमाणात सुरू असून उर्वरित दोन्ही जलतरण तलाव बंद अवस्थेत आहेत. या जलतरण तलावाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था  झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे ते बंद आहेत. त्यामुळे दोन्ही जलतरण तलाव सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन सोमवारी, १७ मार्च रोजी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  श्याम कदम मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना दिले.

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढतेय,  शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यावर अनेक विद्यार्थी पोहणे शिकण्यासाठी या जलतरण तलावावर गर्दी करतात, मात्र दोन्ही जलतरण तलाव बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. 

सोलापूर शहरात विजापूर रोडवर आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने बांधण्यात आलेला होता, तो तलाव महानगरपालिकेने काही काळासाठी ताब्यातही घेतला होता, पण कर्मचाऱ्यांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाला गळती लागून व त्याची दुरावस्था होऊन तो बंद स्थितीत आहे.

आम्ही महानगरपालिकेकडे वर्ग करताना सुस्थितीत जलतरण तलाव हस्तांतरित केला होता, जर महानगरपालिकेला तो चालवणे होत नसल्यास आम्हाला आम्ही दिलेल्या सुस्थितीमध्ये तलाव आमच्याकडे वर्ग करावा तरच आम्ही तो जलतरण तलाव सुरू करू, अशी जिल्हा क्रीडा अधिकारी यांची भूमिका असल्याचं त्यांच्याशी संपर्क साधल्यावर पुढं आलं आहे.

महानगरपालिकेने अधिकारी, आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे तो जलतरण तलाव वर्ग केला आहे, असं सांगितलंय. उभयतांच्या चालढकलीत सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत आहेत. त्यामुळं तो जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्यात यावा, या आग्रही मागणीसाठी संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, लखन पारसे, अकबर शेख, संघटक शेखर स्वामी, राजेंद्र माने, उपाध्यक्ष सतीश वावरे, चंद्रशेखर कंटीकर, सिद्धाराम साबळे आदी उपस्थित होते.

To Top