प्रार्थना स्थळावरील भोंग्यासंबंधी शासन आदेशाची अंमलबजावणी करा : डॉ. बसवराज शिवपुजे

shivrajya patra

रमजान ईद निमित्त शांतता समितीची पोलीस स्टेशनला सभा संपन्न

श्रीरामपूर/प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांसंबंधी दिलेले निर्देश व विधानमंडळात मागील आपल्याला झालेली चर्चा या अनुषंगाने शहरातील सर्व प्रार्थनास्थळांवरील भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहतील, तसे दिवसा सुद्धा आवाजाची मर्यादा पाळून त्यांचा वापर करण्यात यावा. भोंग्यांच्या वापरासाठी रितसर पोलीस खात्याचे परवानगी घ्यावी, ती देण्यात येईल. विनापरवानगी वापरले जाणारे तसेच आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी दिला.

शहरातील प्रार्थना स्थळातून वापरल्या जाणाऱ्या भोंग्यांच्या वापराबाबत तसेच रमजान ईदच्या इतर नियोजनासाठी शहरातील सर्व मशिदींचे रस्ते व धर्मगुरू यांची बैठक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. शिवपुजे बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, यापूर्वी देखील आपण रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोग्यांचा वापर न करण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या होत्या. आता नव्याने त्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ज्या ज्या प्रार्थना स्थळांवर भोंग्यांचा वापर केला जातो, त्यांनी पोलीस खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. 

त्यासाठीचा फॉर्म सर्वांनी भरून द्यावा तसेच आवाजाच्या मर्यादेची उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी चार भोंगे असतील ते कमी करावेत, जेणेकरून डेसिबल वाढणार नाही. शासनाकडून प्राप्त सूचनांचे पालन करून रमजान महिन्याच्या सण आनंद साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी शहरात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत असते. भोंग्यांचे वापराबाबत यापूर्वी देखील सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे पालन करावे. डिसिबल मशीन ने प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही डेमो देणार आहोत. त्यानंतर मात्र आवाज वाढल्यास कारवाई करण्यात येईल. ज्या परिसरात एकापेक्षा जास्त मशिदी असतील त्या ठिकाणी एका मशिदीमध्ये माईकवर आजान देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी केली. 

यावेळी बोलतांना ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांनी भोंग्यांच्या वापराबाबत सर्व मशिदींमधून योग्य ती काळजी घेतली जात आहे. सकाळची नमाज च्या वेळी दिली जाणारी अजान सहा वाजेच्या आत वेळ असल्यास दिली जाणार नाही. काही मशिदींमधून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. इतर ठिकाणी सुद्धा आजपासून ते सुरू होईल, असे सांगितले.

पोलीस स्टेशन तर्फे दिली जाणारी इफ्तार पार्टी पुढील आठवड्यात करण्यात येईल. त्यासाठी जामा मशीद मध्ये आम्हाला वेळ मिळावा. गेल्या वर्षी प्रतिक्षा यादी वाढल्याने आमचा नंबर लागू शकला नाही. यावर्षी मात्र इफ्तार पार्टी साठी प्राधान्य द्यावे, असे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.

या प्रसंगी शहरातील विविध मशिदींचे विश्वस्त सर्वश्री नजीर मुलाणी, डॉ. राज शेख, महबूब कुरेशी, बाबु कुरेशी, फिरोज दस्तगीर, कलीम कुरेशी, सुलेमान शेख, मन्सूर जहागीरदार, सय्यद युसुफ, रियाज बागवान, याकुब शाह, रियाज पठाण, मौलाना रियाज, हाफिज सुलेमान, फयाज शेख, इस्माईल बागवान, ताजोद्दीन काझी आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.

... चौकट ...

इस्लाम धर्म कोणालाही त्रास देण्याची देत नाही शिकवण : अहमद जहागीरदार 

'भोंग्यांबाबतचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. राज्य शासनामार्फत त्याची अंमलबजावणी करण्याचे फक्त आता निश्चित करण्यात आले आहे. हा नियम सर्व धर्मीयांसाठी आहे. इस्लाम धर्म कोणालाही त्रास देण्याची शिकवण देत नाही. त्यामुळे आपल्या आवाजामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल,' असं अहमद जहागीरदार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

To Top