जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार

shivrajya patra

शालेय गुणवत्तेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष कौतुकास पात्र

सोलापूर : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशिष्ट विकास निदर्शक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

मुंबई येथील प्रेसिडेन्शियल बॉल रूम, विवांता बाय ताज प्रेसिडेंट, येथे या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. सन 2024-25 या काळात वाचन क्षमतेत लक्षणीय सुधार दर्शवणाऱ्या इयत्ता 6 ते 8 वी च्या मुलांची संख्या या निकषांच्या क्रमवारीत पंधरा स्थानाची झेप घेणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष कौतुकास पात्र झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दैनिक लोकसत्ताकडून विशिष्ट विकास निदर्शक हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

‘लोकसत्ता’चा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘जिल्हा निर्देशांक’. यात सांख्यिकी विभाग संकलित करत असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’ तर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले जाते. हा निर्देशांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रसृत केला गेला. 

(शिवभार: लोकसत्ता)

यावेळी प्रधानमंत्री यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, ‘आयएसईजी’ फाऊंडेशनचे संस्थापक भागीदार आणि संचालक डॉ. शिरीष संख्ये, ‘अर्थ ग्लोबल’चे कार्यकारी संचालक निरंजन राजाध्यक्ष या तज्ज्ञांचा निर्देशांक निश्चितीत सहभाग होता.

या उपक्रमांतर्गत लातूर, चंद्रपुर, रत्नागिरी, मुंबई, अहिल्यानगर, धराशीव, रायगड, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांना विविध वर्गवारीतील कामगिरीसाठी यावेळी गौरवण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

To Top