शहर हरित व सुंदर दिसण्यासाठी हरित आच्छादने तयार करण्यासाठी लोकसहभाग गरजेचा : आयुक्त डॉ. ओंबासे
सोलापूर : शहर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ३३ टक्के हरित क्षेत्र निर्मिती करणेकामी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे अध्यक्षतेखाली शहरातील उद्योजक, पर्यावरण प्रेमी संस्था व नागरिक यांचे समवेत सोमवारी, ०३ मार्च रोजी इंद्रभुवन इमारतीमधील आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरात मोठ्या प्रमाणात हरीत पट्टे तयार करण्याकरीता उद्योजक, पर्यावरण प्रेमी सरसावल्याचं दिसून आलंय.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त तैमुर मुलाणी, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त (पर्यावरण विभाग) शशिकांत भोसले, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे, उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, धवल शहा, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, अंबादास बिंगी, पंकज चिंदरकर, नरेंद्र गायकवाड, अनिल जोशी, डॉ. मनोज देवकर, नारायण पाटील, बँक ऑफ बडोदाचे अमित चौधरी, पवन देसाई, अभिषक बदलापुरे, विजय जाधव, भारत पाटील यांच्यासह सामाजिक संघटना, वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी, उद्योजक उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व उपस्थितांचे स्वागत करून हरित सोलापूर चर्चा सत्राच्या' आयोजनाची सविस्तर माहिती दिली. तद्नंतर उपस्थित सर्व उद्योजक, पर्यावरण प्रेमी संस्था व नागरिक यांनी आपली ओळख करून देऊन शहरातील दुभाजक, रोडच्या दोन्ही बाजु व ओपन स्पेसच्या ठिकाणी पुढील तीन वर्षात जास्तीत-जास्त वृक्षारोपण करून हरित पट्टा विकसित करण्याकामी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.
यावेळी आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी शहरातील उद्योजक, पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था, वृक्ष संघटना, सामान्य नागरिक यांचीशी सावंद साधताना म्हणाले की, सोलापूर शहर हरीत व सुंदर करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे. बांधकाम परवानगी देताना ग्रीन बिल्डींग प्रकल्पास चालना देणेकामी स्वतंत्र धोरण नेमण्यात येईल. येणाऱ्या पावसाच्या कालावधीत वृक्षारोपण करण्याकामी झोननिहाय नियोजन करून परिसरातील शाळा व संस्थांना त्यामध्ये सहभागी करून घेण्याकामी स्पर्धाचे आयोजन करण्यात येईल.
पुणे शहराच्या धर्तीवर वृक्ष प्राधिकरण पुनर्गठन करणेकामी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येईल. सी. एस. आर. निधीमधून प्राणी संग्रहालय परिसरामध्ये कमीत कमी ३०% हरित क्षेत्र विकसित करणे करिता आराखडा तयार करणेत यावा. अक्कलकोट रोड MIDC परिसरातील ओपन स्पेस येथे वृक्षारोपण करण्यासाठी संस्थांच्या मागणी अर्जानुसार प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावे. शहरातील उपलब्ध ओपन स्पेसची स्वतंत्र यादी तयार करून वृक्षारोपण करिता उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आयुक्त यांनी दिली.
...आयुक्त यांचे आवाहन !
तसेच शहर हरित व सुंदर दिसण्यासाठी हरित आच्छादने तयार करण्यासाठी लोक सहभाग असणे गरजेचे असून यामध्ये पर्यावरण प्रेमी/सामाजिक संस्था/उद्योजक यांचे मार्फत शाळा, दवाखाने, शासकीय इमारत परिसर, खुल्या जागा हरित पट्टे, रोड डिव्हायडर वृक्षारोपण/मेन्टेनन्स करण्यात करीता सहभागी व्हावे, त्याकरिता उपायुक्त तैमूर मुलाणी (नोडल अधिकारी) (email- dmcsolapur2@gmail.com) यांच्याकडे विहित मसुदा सादर करावयाचे असून सदर सादरीकरणाचा मसुदा सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.