सोलापूर : सध्या सोलापूर शहरात कडक उन्हाळा चालू असून दिवसेंदिवस उष्णतेचा पारा उंचावत आहे. अशा कडक उन्हात काम करताना स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास त्रास जाणवतो. त्यामुळं घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना यंदाही कामाच्या वेळेत बदल करण्याची मागणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन, सोलापूर च्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडं निवेदन देऊन करण्यात आलीय.
अनेक कर्मचारी वाढत्या वयोमानानुसार रक्तदाब, शर्करा रोग अशा अनेक प्रकारच्या व्याधींनी त्रस्त आहेत. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये कर्मचाऱ्यांना उष्णघातामुळे आरोग्यविषयक विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
कडक उन्हात काम करताना दम लागणे, उष्माघातामुळे चक्कर येऊन पडणे असे प्रकार अचानकपणे घडतात. अतिरिक्त आयुक्त रवी पवार व घनकचरा व्यवस्थापन विभाग मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
आपल्या शहरामध्ये उन्हाळा कडक असल्यामुळे प्रत्येक वर्षी अनेक कर्मचारी चक्कर येऊन पडण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच सोमपामधील कर्मचाऱ्यांचे मेडिकल कॅशलेस कार्ड बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांना उपचार घेण्यातही आर्थिक संकट उभं राहते.
महानगरपालिकेच्या परिपत्रकानुसार घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना पहाटे ५:३० ते दुपारी १:३० अशी कामाची वेळ निश्चित करण्यात आली असून या वेळेमध्ये बदल करून सकाळी ६ ते दुपारी १२:३० वा. पर्यंत वेळ करून मिळावी. सोमनपा मधील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्याप्रमाणेच बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना त्यांचे मूलभूत हक्क द्यावेत, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कायम व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षीप्रमाणे महिला झाडूवाली यांना दोन साड्यांचे वाटप करावे, तसेच गटार बिगारी, ड्रेनेज बिगारी, बदली रोजंदारी कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना खाकी कलरचा ड्रेस व शिलाई भत्ता मिळावा यासह अन्य मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.
त्यावर सोमपा व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांना कामाच्या साहित्याच वाटप, कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय सकारात्मक घेणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पवार यांनी ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, ट्रेड युनियनचे प्रमुख संघटक राम चंदनशिवे, सुनील शिंदे, भिकाजी कांबळे, ट्रेड युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.