महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाचा रौप्य महोत्सव 2025....
सोलापूर : राज्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. त्यातूनच विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास घडू शकतो, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
करमाळा तालुक्यातील मोरवड येथे सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या म.ज्योतिराव फुले विद्यालयाचा रौप्य महोत्सव 2025 सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला, त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. या सोहळ्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी आमदार नारायण आबा पाटील, करमाळा तहसिलदार शिल्पा ठोकडे, संस्थेचे अध्यक्ष वसंत मोहोळकर, सचिव रोहित मोहोळकर, मुख्याध्यापक मोहोळकर, नेचर डेअरी उद्योग समुहाचे अध्यक्ष अर्जून देसाई, तसेच मोरवड गावचे सरपंच रामहरी कुदळे उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे यांनी मोहोळकर कुटुंबीयांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल शुभेच्छा देत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल भाष्य केले. तसेच संस्थेला व शाळेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
क्रिडा युवक कल्याण व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी क्रिडाक्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व प्रकारचे क्रीडा साहित्य क्रीडा विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक मोहोळकर यांनी शिक्षण संस्थेच्या 25 वर्षांच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, खंडोजी मोहोळकर गुरूजींनी 2000 साली या संस्थेची स्थापना केली, त्याचे ध्येय गरीब व गरजू शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे होते. आज या संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे, जे दर्शवते की, शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उच्चपदांवर काम केले आहे.
यावेळी परिसरातील नागरिक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.