सोलापूर : इफ्तार पार्टीमुळे हिंदू-मुस्लिम समाजातील स्नेहभाव अधिक प्रमाणात वृद्धिंगत होऊन सामाजिक एकोप्याचे दर्शन घडते, असे प्रतिपादन माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही खरादी परिवार आणि स्मृति फाऊंडेशनतर्फे बेगम पेठ येथे हिंदू मुस्लिम महिलांसाठी रमजान सणानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. खरादी परिवाराने हिंदू -मुस्लिम बांधवांना एकत्र आणत सामाजिक समतेचा संदेश दिला. इफ्तार पार्टी कार्यक्रमाला क्षेत्रातील मान्यवर महिलांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना पवित्र रमजान महिन्याच्या व येणार्या रमजान ईदच्या खास शुभेच्छा दिल्या.
समाजात बंधुभाव वाढावा, याकरिता मुस्लिम बांधव पहाटेपासून कडक उपवास धरतात. हे उपवास केवळ आपल्याच समाजापुरतेच मर्यादित न ठेवता ते सर्व धर्मांतील लोकांच्या कल्याणाकरिता धरतात. त्यात पवित्र रमजान महिन्यातील अशा इफ्तार पार्टीमुळे दोन्ही समाजांतील एकोपा वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वारंवार आयोजन केल्यास त्याचा संपूर्ण मानवजातीला लाभ होईल. रियाज खरादी यांचा हा उपक्रम असल्याचे माजी नगरसेविका मोहिनी पत्की यांनी सांगितले.
यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी महापौर अलका राठोड, सायरा शेख, बार असोसिएशनचे पदाधिकारी निदा सैफन, अॅडवोकेट सुरते, अॅडवोकेट सुमय्या बांगी, सेंट जोसेफचे प्रा. आनंद गायकवाड, अॅडवोकेट जहीर सगरी, योग गुरु सुधा अळ्ळीमोरे, संगीता जाधव, अॅडवोकेट रईसा मदने, केतन शहा, वसीम सालार, कुंदन जाधव, शोभा नष्टे, अनुजा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
चौकट
एकमेकांसोबत राहूनच आपापसात वाढतं प्रेम
प्रत्येक धर्मामध्ये कोणावरही अन्याय करू नका, गरिबांना मदत करा असे शिकवले जाते. एकमेकांसोबत राहूनच आपापसात प्रेम वाढत असते, हाच संदेश आम्ही इतर पार्टीद्वारे दरवर्षी देत असतो.
रियाज खरादी, माजी नगरसेवक