शीर्षक नाही

shivrajya patra

मजान महिन्याचा दुसरा अशरा (दहा दिवसांचा कालखंड अशरा म्हणून ओळखला जातो.) आता सुरु झाला आहे. दैनंदिन दिनक्रम आता स्थिर झाला आहे. उन्हाळ्याचा त्रास ही काही अंशी अंगवळणी पडला आहे. पूर्वी मंदिरे, मशिदी या कच्च्या होत्या, मात्र भक्ति करणारे भक्त पक्के होते. आता खूप बदल झालाय. 

रात्रीच्या नमाज मध्ये स्लबमध्ये होणाऱ्या उकाड्याची तीव्रता कमी करण्यासाठी मशिदींमधून कुलरची व्यवस्था तातडीने करण्यात येत आहे. प्रार्थना करतांनाही आरामात विना त्रास करण्याची प्रवृती वाढत आहे. आपण उन्हाळ्याची थोडीशी तीव्रता सहन करु शकत नाही, मग जे रात्रं-दिवस भट्टीसमोर उभे राहून कार्य करतात, ते कसे सहन करीत असतील त्यांची जाणिव यानिमित्ताने सर्वांना होत असेल.               

रमजान महिन्यातील रोजे म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे. संयम (सब्र)निर्मिती हा देखील रोजाचा स्थायीभाव आहे. म्हणूनच रमजानला सब्र का महिना असे ही म्हटले जाते. रमजान मध्ये उपवास सुरू केल्यानंतर आपण स्वतःच काही बंधने लादून घेत असतो. एकदा पहाटे सहेरी खाण्याची वेळ संपल्यानंतर सूर्यास्तापर्यंत काही ही न खाण्याचा निश्चय स्वतःच करीत असतो. हीच स्वयंशिस्त आपल्यामध्ये संयम निर्माण करते. 

उपवास केल्याने भुकेल्याची अवस्था, तहानलेल्यांची व्याकुळता याची जाण आपल्यात निर्माण होते. ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही, त्यांची काय अवस्था होत असेल, याची जाणिव निर्माण होते. जे तहानलेले असतात, त्यांच्या प्रती सहानुभूतीची भावना निर्माण होते. आपल्याला सर्व सुखे प्राप्त आहेत, परंतु या जगात जे दीन आहेत, गरीब,अनाथ आहेत, ते आपले जीवन कसे जगत असतील याची जाणिव रोजामुळे निर्माण होते.

एकदा रोजा धरल्यानंतर सायंकाळपर्यंत आता काही ही सेवन करायचे नाही, अन्यथा ईश्वर नाराज होईल ही भिती मनात बाळगून आपण मगरीबची वेळ होण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अकरा महिने मगरीब आपली वाट पाहते. पण या महिनाभर आपण मगरीबची प्रतिक्षा करीत असतो. एक मिनीट जरी इफ्तारला वेळ असेल व आपल्याला कितीही तहान लागलेली असली तरी आपण समोरच्या पाण्याच्या ग्लासला हात लावीत नाही, स्वयंशिस्तीचे यापेक्षा दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही.

समाजातील जे गरजू घटक आहेत त्यांच्या गरजांची जाणिव व्हावी व या गरजा पूर्ण करण्याची भावना आपल्यात निर्माण व्हावी हा रोजाचा मूळ उद्देश आहे. रोजाच्या माध्यमातून ईश्वरी आदेशांचे पालन करुन आपले वर्तन सदाचारी करण्याबरोबरच आपल्या स्वच्छंदी आचरणाला लगाम घालून स्वतःचं स्वतःवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न रोजेदार हा करीत असतो. (क्रमशः)

सलीमखान पठाण-9226 40 8082.

To Top