आमीन.
प्रत्येक समाजाचे आपल्या धर्मानुसार चालीरीती, रूढी, परंपरा यांच्याशी संबंधित काही कायदे आहेत. त्यानुसार समाज आपली वाटचाल करीत असतो. विवाह, मृत्यु, व्यवहार यांचे सुद्धा काही नियम प्रत्येक समाजाने आपल्या धर्मानुसार निर्माण केलेले आहेत. कुरआन शरीफनुसार प्रत्येक मुस्लिमाने कसे जगावे आणि कसे जीवन व्यतीत करावे, यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार इस्लामी शरीयत कायदा तयार झाला आहे, त्याप्रमाणे प्रत्येक मुस्लिमाने आपले आचरण ठेवावे अशी अपेक्षा आहे.
आपल्या बहुधर्मीय देशात विवाह आणि घटस्फोट याबाबत विविध धर्माचे वेगवेगळे नियम आहेत, तसेच मृत्यू नंतर अंत्यविधीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक समाजाच्या चाली-रीती सुद्धा वेगळ्या आहेत.
आजपर्यंत सर्व जण त्याप्रमाणे आपले आचरण, वर्तन करीत आहेत. एका धर्माच्या चालीरीतीचा दुसऱ्या धर्मावर कोणताही परिणाम झालेला नाही. गुण्यागोविंदाने सर्व देशवासी राहत आहेत. एक देश म्हणून देशवासियांसाठी भारतीय घटनेनुसार काही कायदे समान केलेले आहेत. गृह खात्याशी संबंधित कायदे देशाच्या सर्वधर्मीय नागरिकांना लागू आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या धर्माच्या शिक्षा वेगळ्या असल्या तरी आपल्या देशात त्या लागू होत नाहीत.
उदाहरणार्थ इस्लामी राजवटीमध्ये चोरी करणे, बलात्कार करणे, खून करणे अशा गुन्ह्यांना ज्या शिक्षा आहेत, त्या आपल्या देशातील घटनेने देशवासीयांना लागू केलेल्या नाहीत. फसवणुकीसाठी जी शिक्षा इस्लामी कायद्यात आहे, भारतीय कायद्यात ती नाही. सर्व भारतीयांसाठी वेगळे नियम आहेत, असे असताना देखील कधी कधी समान नागरी कायदा या विषयाची चर्चा होत असते.
जवळजवळ ९८ टक्के भारतीयांना एकच कायदा लागू आहे. फक्त विवाह आणि वारसा हक्क यांचे कायदे प्रत्येक धर्मानुसार वेगळे आहेत. सर्व देशवासियांसाठी समान कायदा हवा याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण काही संवेदनशील विषयांबाबत व्यापक चर्चेतून निर्णय झाले पाहिजे. मुस्लिमांमध्ये बहुपत्नीत्वाचा कायदा अस्तित्वात आहे. त्याला सातत्याने विरोध होत असतो, परंतु तो कायदा आहे त्याची प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी किती लोक करतात यावर ही संशोधन झाले पाहिजे, म्हणजे वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
एकीकडे दुसरी पत्नी करू नये, असा काही धर्मात नियम आहे, पण मग अनैतिक संबंध ठेवलेले चालतात का ? याबाबतही नियम झाले तर सर्वांना समान सूत्रात गुंफणे योग्य होईल. रमजान महिन्यातील शब ए कदर झाली म्हणजे रमजान संपला असे नाही. अजूनही दोन-तीन दिवस शिल्लक आहेत. या कालावधीचा पुरेपूर फायदा करून घेत सदुपयोग करणे आवश्यक आहे.
महिनाभर ज्या आत्मीयतेने आपण कुरआन शरीफचे वाचन केले. त्यातील अनेक गोष्टी आजही आपल्या जीवनात प्रत्यक्ष दिसत नाही. त्या अंगीकारण्याची गरज आहे. कुरआन मधील अल्लाहचे आदेश समजून घेऊन त्याचे पालन करण्याचा निश्चय जर प्रत्येकाने केला तर प्रत्येकाचे जीवन हे समृद्ध आणि सत्कारणी लागणार आहे.
दैनंदिन जीवनामध्ये सैतानी प्रवृतींच्या सान्निध्यामुळे आपण आपला मूळ उद्देश हरवून बसलो आहोत. कशासाठी आपण या जगात आलो ? आपण काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे, हे सर्व विसरून गेलो आहोत. याबाबत चिंतन करण्याची आवश्यकता आहे.
या सृष्टीमध्ये अनेक सजीव आहेत.परंतु माणूस सोडून इतर एकही सजीव सृष्टीचे नियम मोडत नाही.पण माणूस पावला-पावलावर नियम भंग करतोय. त्याची ही सवयच त्याला संकटात टाकत आहे.
विश्व निर्माता अल्लाह किंवा ईश्वर याने ही सृष्टी निर्माण करताना सर्वात श्रेष्ठ दर्जा मानवाला दिला.परंतु या मानवाने आपल्या वर्तनाने त्या दर्जाला कलंक लावला. सृष्टीसाठी घालून दिलेले नियम मोडून माणसाने ईश्वराचा कोप आपल्यावर ओढवून घेतलेला आहे आणि अजूनही हे काम चालूच आहे. म्हणूनच जगावर कोरोनाची आपत्ती आलेली आहे.
यातून सावरण्यासाठी प्रत्येकाने आपल्या नीतिमत्तेत व आचरणात बदल करण्याचा निश्चय केला पाहिजे. अल्लाहची भिती मनात बाळगून पापभिरू वृत्तीने वागण्याचा पण केला पाहिजे. तरच आपण यातून वाचू शकतो.
सृष्टीसाठी ईश्वराने काही नियम केलेले आहेत. त्या नियमानुसार या जगाचा कारभार चालत असतो. माणसासाठी देखील प्रत्येक देशात वेगवेगळे असे नियम केलेले आहेत आणि ते नियम पाळण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची असते.
पाच वर्षांपूर्वी कोरोनाचा अनुभव आपण घेतला. कोरोना वाढू नये म्हणून नियम लागू केले. लॉक डाऊन केला. गर्दीला प्रतिबंध घालण्यासाठी कायदे व नियम असतात आणि कायदे मोडले गेल्यास त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस नेमले जातात. पण ज्यावेळी रक्षकच भक्षक बनतात, त्यावेळी बंड निर्माण होतात, हेच जगाचा इतिहास सांगतो.अन्याय जर केला तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. ईश्वराची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. तेव्हा परिस्थितीवर संयम ठेवून प्रत्येकाने शांततेने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कायद्याच्या रक्षकावर होणारे हल्ले ते जरी चुकले तरीही समर्थनीय नाहीत. ही बाब लक्षात घेऊन जबाबदार लोकांनी जबाबदारीनेच वागावे एवढेच म्हणावेसे वाटते. (क्रमश:)
सलीमखान पठाण - 9226408082.
