सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय युवा प्रेरणा शिबिराचा समारोप
सोलापूर : आज जगासोबतच देशासमोर वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण झाली आहे. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धनाची गरज आहे. पर्यावरण संतुलन राखणे महत्त्वाचे आहे, तरच देशाचे भवितव्य उज्वल असणार आहे. त्यासाठी युवकांनी काम करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
शुक्रवारी, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 ते 21 मार्च 2025 या कालावधीत विद्यापीठामध्ये आयोजित प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचा समारोप कुलगुरू प्रा. डॉ. महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम कवी प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे यांनी केले.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य अवलंबून आहे. शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा युवा प्रेरणा शिबिर संपन्न झाला. यामध्ये तरुण-तरुणींना तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाच्या ग्रीनकॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी पाच दिवस घालवले. जाताना येथील अनुभव घेऊन देशासाठी योगदान देण्याकरिता विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावं, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
प्रा. मलकमपट्टे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. युवा प्रेरणा शिबिरामुळे विद्यार्थ्यांना करिअरसाठी निश्चितच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून एकूण 200 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी सहभागी विद्यापीठे आणि स्वयंसेवकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच उत्कृष्ट स्वयंसेवक, संघ व संघप्रमुख पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास उत्तम व उत्कृष्ट संघाचा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी सहभागी स्वयंसेवक आणि संघप्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विविध समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व डॉ. अंबादास भास्के यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या राज्यस्तरीय युवा प्रेरणा शिबिराचा समारोप कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ख्यातनाम कवी प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. वीरभद्र दंडे व अन्य छायाचित्र दिसत आहेत.