सोलापूर : आमच्या मंडळाची बैठक सोडून रावण साम्राज्य च्या बैठकीला गेल्याच्या कारणावरून कोयत्यानं वार झाल्यानं दर्शन अच्युत भोसले हा २९ वर्षीय तरूण जखमी झाला. ही घटना जिल्हा क्रिडा संकुलसमोर शनिवारी रात्री ०८ वा. च्या सुमारास घडलीय. या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील कुमठा नाका तक्षशिला नगरातील रहिवासी अप्पा कांबळे याने रात्री चहाचा गाडा बंद करून घरी जात असलेल्या दर्शन (रा. भारत नगर) याला रस्त्यात अडवून, 'लय मस्ती आली आहे, तू पुण्यावरून येथे करून खायला आला आहे आमच्या मंडळाची मिटींग सोडून रावण सामाज्य च्या बैठकीला का गेला म्हणून त्याच्या हातातील कोयत्याने दर्शनच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर व पाठीवर मारून जखमी केले. आज तू वाचला, तुला उद्या खल्लास करतो, अशी दमदाटीही दिली.
हे भांडण सोडविण्यासाठी आलेला दर्शनचा भाऊ रोहित याला देखील शिवीगाळी-दमदाटी केली. याप्रकरणी जखमीच्या दाखल फिर्यादीनुसार आप्पा कांबळे, शेखर सुरेकर, अभिषेक रोहिटे आणि एक अज्ञात इसम (रा. तक्षशिल नगर कुमठा नाका, सोलापूर) यांच्याविरुध्द भा.न्या. संहिता कलम ११८(१), ११५(१), ३५२, ३५१, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.