महिला दिनी 'चहा कट्टा' तर्फे एमपीएससी उत्तीर्ण भोजने भगिनींचा सत्कार; हास्य कवी नायगांवकरांची उपस्थिती

shivrajya patra

सोलापूर :  जागतिक महिला दिनानिमित्त सोलापुरातील उदयोन्मुख व यशस्वी व गुणी महिलांचा सत्कार करावा, या उद्देशाने चहा कट्टा तर्फे MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सोलापुरातील कु. संजीवनी ज्योतिबा भोजने व कु. सरोजिनी ज्योतिबा भोजने या भोजने भगिनींचा ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगांवकर यांच्या हस्ते सत्कार करून उभयतांना शुभेच्छा देण्यात आल्या.

चहा कट्टा तर्फे नेहमी निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात. शनिवारी, 08 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भोजने भगिनींच्या सत्काराचं आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी देखील सोलापुरातील महिला खेळाडू श्रावणी सूर्यवंशी हिचा महिला दिनानिमित्त चहा कट्ट्यावर सत्कार केला होता.

आजच्या या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ हास्य कवी अशोक नायगांवकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भोजने भगिनींचा सत्कार करण्यात आला.

कु. संजीवनी व कु. सरोजिनी या भोजने भगिनींचं शालेय शिक्षण येथील संभाजी विद्यामंदिर तसेच महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात झालं आहे. घरची परिस्थिती सामान्य असताना देखील त्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.

वडील ज्योतिबा भिकाजी भोजने मेकॅनिक म्हणून काम करतात. आई सौ. रेशमा गृहिणी असून घरची परिस्थिती सामान्य असूनही भोजने दाम्पत्यानं दोन्ही मुलींना चांगले शिक्षण मिळावं, म्हणून खूप कष्ट घेतलेले आहेत. दोन्ही भगिनींनी एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे त्या कष्टाचे चीज झालं आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.       

कार्यक्रमास उपस्थित असलेले जेष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांचा सत्कार चहा कट्ट्याचे सदस्य, दैनिक सांजचे  संपादक व ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी  यांनी केला. याप्रसंगी चहा कट्ट्याचे सदस्य एडवोकेट बसवराज सलगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भोजने भगिनींना शुभेच्छा दिल्या.

अशोक नायगावकर यांनीही भोजने भगिनींना शुभेच्छा देऊन त्यांच्यासाठी आपल्या शैलीमध्ये चार ओळी सादर केल्या. त्यांनी यावेळी महिला दिनाच्या काव्यात्मक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चहा कट्ट्याचे सर्व सदस्य उपस्थित होते.


To Top