माध्यमात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान; श्रमिक पत्रकार संघ-राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा संयुक्त उपक्रम
सोलापूर : महिलांना प्रत्येक वेळी समाज व्यवस्थेने प्रोत्साहन दिले आहे. देवी नव्हे तर महिला म्हणून समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. महिला सक्षमपणे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांनी न डगमगता पुढे गेले पाहिजे. केवळ महिला दिनच नव्हे तर प्रत्येक दिवशी महिलांसाठी जगण्याचा महोत्सव साजरा व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा चित्रा कदम यांच्या हस्ते माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विचारपीठावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदींचीची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील पुढे म्हणाल्या, ऋषीमुनींच्या काळातही विद्वान महिला होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांनी छत्रपती शिवरायांना घडविले. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी महिलांच्या हातात पुस्तक देऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे केले. आज विविध क्षेत्रात महिला या धैर्याने काम करीत आहे. आपला वेगळा ठसा उमटविला आहे. कौटुंबिक आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या महिलांना पार पाडाव्या लागतात. यामध्ये कुटुंबाकडे दुर्लक्ष व्हायला नको, असंही त्यांनी यावेळी म्हटले.
श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. पत्रकार अश्विनी तडवळकर यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. याप्रसंगी सत्कारमूर्ती महिलांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध माध्यमातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
समाज घडविण्याचे महान कार्य महिलांकडून घडते : चित्रा कदम
आज महिला विविध क्षेत्रात धैर्याने, जिद्दीने, चिकाटीने आपला ठसा उमटवीत आहेत. कुटुंबाबरोबरच समाज घडविण्याचे महान कार्य महिलांकडून घडते. त्यांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे, महिलांचा सन्मान केला पाहिजे. महिला दिन हा दररोज साजरा झाला पाहिजे, अशा शब्दात कार्याध्यक्षा चित्रा कदम यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.