रमजानुल मुबारक - २३... आपले विचार नेहमी चांगले असावे

shivrajya patra

रमजान महिन्यातील शब ए कद्र च्या २१ व २३ या दोन रात्री निघून गेल्या आहेत.२५,२७ व २९ या तीन रात्री अजून शिल्लक आहेत.या तिन्ही रात्री मध्ये शब-ए-कद्र चा शोध घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.जर ही रात्र आपल्याला प्राप्त झाली तर हजार महिन्यांच्या इबादतीचे पुण्य प्राप्त होणार आहे. 

त्यासाठी रमजान पर्वातील या शेवटच्या खंडातील ज्या काही रात्री आपल्याला मिळतील,त्यात जास्तीत जास्त प्रार्थना करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कुरआन शरीफच्या माध्यमातून अल्लाहने आपल्या पैगंबरांमार्फत एक अनमोल मार्गदर्शक असा ग्रंथ आपल्याला दिला आहे.

त्यामुळे आपले हे जीवन सार्थकी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे व कोणत्या गोष्टी पासून दूर राहिले पाहिजे याचे उत्तम आणि सखोल ज्ञान आणि मार्गदर्शन कुरआन शरीफ मध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी त्याचे वारंवार वाचन, पठण करून चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. आपण जितके जास्त त्याचे वाचन करू तितका चांगला अर्थ आपल्याला समजणार आहे व त्या पद्धतीने वर्तन करण्यास आपल्याला सुलभ जाणार आहे.

एकमेकांबद्दल वाईट बोलू नका, कोणाचे वाईट चिंतू नका, एखाद्या व्यक्तीच्या काही गोष्टी आपल्याला पटल्या नसतील तर प्रत्यक्ष त्याच्याशी बोला व आपले समज गैरसमज दूर करून घ्या, त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनाला आणा आणि जास्तीत जास्त चांगले जीवन जगा, असं कुरआन शरीफ मध्ये अल्लाहने म्हटले आहे. कुणालाही दोष देऊ नका. विनाकारण कुणाची हेतुपुरस्सर बदनामी करू नका, त्यामुळे मनं कलुषित होतात. 

बदनामी हा सर्वात मोठा वाईट गुण आहे. त्यापासून अलिप्त राहणे कधीही चांगले. स्वार्थी भावनेने कोणतेही कार्य करू नका, समर्पित भावनेने कार्यरत रहा, आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब आपल्याला द्यावयाचा आहे, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व त्या प्रमाणे आपले आचरण असावे, असेही कुरआनमध्ये म्हटले आहे.

कुणाला पाठीमागे वाईट बोलू नका, याला गिबत म्हणतात. हा फार मोठा गुन्हा आहे. यापासून दूर राहा, अशी ही शिकवण कुरआनमध्ये दिली आहे. व्याजाशी संबंधित देणे-घेणे दोन्हीही हराम आहे. त्यामुळे व्याजाने पैसे देणे बंद करा. नफा कमावताना प्रमाणामध्ये असावा. जास्त नफेखोरी योग्य नाही.

बदला घेण्याची भावना मनाशी कधीही बाळगू नका. तुम्हाला बदला घेण्याचा अधिकार नाही. प्रत्यक्ष एक आणि मनात एक असं वागू नका. जे पोटात आहे, तेच ओठात ठेवा. यातच तुम्हा सर्वांच भलं आहे, हे लक्षात ठेवा. दिलेले शब्द पाळा. एखाद्याला जर आपण शब्द दिला असेल तर त्याचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्याप्रमाणे आपण वागावे, अशी शिकवण कुरआन शरीफ मध्ये दिली आहे.

समाज जीवनामध्ये वावरताना ज्या काही गोष्टी करणे आवश्यक आहे, त्या सर्व चांगल्या गोष्टींची शिकवण इस्लाम धर्माने दिली आहे. जगातील कोणताही धर्म वाईट नाही जर असेल तर आपण आहोत, हे ओळखून प्रत्येकाने आपले जीवन जगावे. (क्रमशः) 

सलीमखान पठाण - 9226408082.

To Top