रमजानुल मुबारक 9&10 : कुरआन आणि रमजान & मानवता (इन्सानियत) हाच मोठा धर्म

shivrajya patra

 

कुरआन आणि रमजान

वित्र रमजान महिन्यातील महत्त्वाची घटना म्हणजे कुरआनशरीफ चे पृथ्वीतलावर झालेले अवतरण. अल्लाहतआला, जो समस्त ब्रह्मांड चा रब आहे. जो निसर्ग, पृथ्वी, वातावरण या सर्वांचा मालिक आहे. ज्याला रब्बुल आलमिन म्हटले जाते. तो सर्वांचा आहे. फक्त मुस्लिमांचा नाही. केवळ मुस्लिमांचा असता, तर त्याला रब्बुल मुसलिमीन म्हटले गेले असते. परंतु कुरआनशरीफची जी पहिलीच आयत आहे. ज्याची सुरुवात सुरए- फातेहा मध्ये होते. त्यात म्हटले आहे 'अल्हमदुलिल्लाही रब्बील आलमीन.म्हणजे तो ईश्वर,जो संपूर्ण सृष्टीचा(आलम ) रब आहे.

लोकांच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहतआला ने कुरआन शरीफ हा ईश्वरी ग्रंथ आपला खास दूत फरिश्ता हजरत जीब्रईल मार्फत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांनी तो आपल्या अनुयायांमार्फत लोकांमध्ये आम (सार्वजनिक) केला. अल्लाहने हा ग्रंथ फक्त मुस्लिमांसाठी नाही तर, या जगातील समस्त मानवजातीसाठी पाठविला आहे. म्हणून आज संपूर्ण जगभरामध्ये केवळ मुस्लिम नव्हे तर जगभरातील सर्व जाती, धर्म आणि पंथाचे लोक कुरआनशरीफ समजून घेत आहेत. जगातील सर्व भाषांमध्ये त्याचे भाषांतर झालेले आहे. 

जगातील अनेक विद्यापीठांमध्ये कुरआनशरीफ वर खास संशोधन आजही सुरू आहे. मराठी भाषेत देखील कुरआन उपलब्ध आहे. माझ्या अनेक मराठी मित्रांनी आत्तापर्यंत त्याचा लाभ घेतला आहे. ते कुरआन शरीफचे अध्ययन करतात आणि प्रश्नोत्तर रूपाने समजूनही घेतात. काही वर्षांपूर्वी अहमदनगरमध्ये झालेल्या ग्रंथप्रदर्शनात सर्वाधिक विक्री मराठी भाषेतील कुरआन शरीफ या ग्रंथाची झाली हे विशेष. 

हा ईश्वरी ग्रंथ रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पृथ्वीवर अवतरला. दरवर्षी रमजानमध्ये,जगामध्ये जसेजसे प्रसंग निर्माण होत, त्यानुसार अल्लाह कडून हजरत पैगंबरांना कुरआनच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत असे. प्रेषित हजरत पैगंबरांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी नबुवत (प्रेषित्व) प्राप्त झाली. तद्नंतर लगेच कुरआनशरीफचे अवतरण सुरू झाले. 

जवळपास तेवीस वर्षांच्या कालावधीमध्ये हा ग्रंथ हजरत पैगंबरांपर्यंत आला. त्यांनी तो लोकांपर्यंत पोहोचवला. प्रत्येक माणसाने आपले जीवन कशा प्रकारे व्यतीत करावे, याचे सखोल मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये अल्लाहतआलाने केले आहे. प्रत्येकाने काय करावे, काय करू नये, पुण्य कशामध्ये आहे, पाप कशामुळे होते, मोठ्यांशी कसे वागावे, छोट्यांशी कसे वर्तन करावे, व्यवहारात पारदर्शकता कशी असावी, अशा अनेक बाबी, ज्या आपल्या जीवनाशी संबंधित आहेत. त्याचे मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये केलेले आहे. 

आज आपण कुरआनची शिकवण सोडून दिल्यामुळे संपूर्ण जगच संकटात सापडले आहे. यासाठीच कुरआनशरीफ समजून घेऊन त्याचा अंगीकार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्याची आवश्यकता आहे. (क्रमशः)

*********

मानवता (इन्सानियत) हाच मोठा धर्म

मजान महिन्याचा पहिल्या दहा दिवसांचा भाग (अशरा) आज पूर्ण होत आहे. रहेमत(कृपादृष्टी) चा हा काळ पूर्ण होऊन मगफिरत (माफी) चा दुसरा भाग आज सुरु होईल. कुरआन आणि त्याची शिकवण यावर जे संशोधन, विचारमंथन आजपर्यंत झालेले आहे. त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि, कुरआन हा मानवनिर्मित ग्रंथ नाही. कुणा विद्वानाने तो लिहीलेला नाही तर त्यातील शब्द,आयती, सुरए हे साक्षात परमेश्वर अर्थात अल्लाहने निर्माण केले आहे. 

अरब जगतासह अनेक ठिकाणी कुरआनमधील आयतासारखी वाक्ये तयार करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला, पण त्यात कुणी यशस्वी होऊ शकला नाही. त्यातील एक एक शब्द हा मोठा अर्थपूर्ण असून कुरआन हा दैवी ग्रंथ आहे, यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. 

प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहच्या आदेशाने ज्यावेळी इस्लामचा प्रसार सुरु केला. त्यावेळी सामाजिक परिस्थिती खूप बिघडलेली होती. सामाजिक अध:पतनाच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या होत्या. रानटी प्रवृत्तीनी थैमान घातले होते. गडद अंधारात एक काजवा चमकावा व त्यामुळे क्षणभर तरी तो अंधार दूर व्हावा, त्याप्रमाणे हजरत पैगंबरांच्या रुपाने समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक अल्लाहने निर्माण केला. त्यांनी अल्लाह कडून प्राप्त होणारे आदेश लोकांपर्यंत पोहोचविले व नविन समाज निर्मितीचा प्रारंभ झाला. 

सुरुवातीला हे आरंभ करतांना हजरत पैगंबरांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु जसजसे सत्य समोर येत गेले, तसे त्यांचे विरोधक ही समर्थक बनले.  समाजातील अनेक अनिष्ट प्रथा हजरत पैगंबरांनी झुगारुन दिल्या. मानवता, समता व समरसतेचा संदेश समाजाला दिला. आपण सर्वसमान आहोत. कुणीही ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नाही सर्वजण आपसात भाऊ-भाऊ आहोत, ही नवी संकल्पना त्यiनी समाजाला दिली. सामाजिक न्यायाच्या अनेक गोष्टी त्यांनी विशद केल्या. मुलींच्या जन्माचा तिटकारा करणारांना समज दिली. अल्लाहची उपासना हीच एकमेव भक्ती असून तोच एकमेव उपास्य आहे. इतर कुणीही पूजनीय नाही, असे सांगून एकेश्वर वादाचा पाया घातला.

आपसातील भांडण, तंटे, वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणारांना माणुसकीची शिकवण दिली. सुख-दुःख, हमदर्दी यांची नवी संकल्पना त्यांनी मांडली. ईश्वरभक्ति केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हेच जीवनाचे सार आहे, हे स्पष्ट केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा. समाजाच्या प्रति ही तुमची काही कर्तव्ये आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे मांडले. स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक स्पष्ट केला व ईतरांच्या भल्यासाठी जगला तोच इन्सान होय. ही नवी संकल्पना त्यांनी निर्माण केली. (क्रमशः)                                     

सलीमखान पठाण-९२२६४०८०८२.



To Top