6,000 रुपयांची स्वीकारली लाच; शिपाई गजाआड

shivrajya patra

सोलापूर : भूमि अभिलेख कार्यालयातील शिपायास 6000 रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलंय. ही घटना अक्कलकोट येथील भूमी अभिलेख कार्यालयात घडलीय. महेश भागवत घाडगे (वय-३२ वर्षे) असं लोकसेवक आरोपीचं नांव आहे. त्याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील 34 एकर शेत जमिन सोलार प्लांटसाठी भाडेतत्वावर देण्याचे तक्रारदाराने ठरविले होते. त्यासाठी त्यांनी त्या शेतजमीनीचा गाव नकाशा, स्कीम उतारा, गट नकाशे, टिपण, फाळणी व आकार बंद नक्कल इत्यादी कागदपत्रे मिळण्यासाठी उपअधिक्षक, भुमि अभिलेख कार्यालय, अक्कलकोट येथे जाऊन विनंती अर्ज सादर केला होता. 

त्या कार्यालयातील शिपाई लोकसेवक महेश भागवत घाडगे यांनी तो अर्ज स्वतःकडे ठेऊन घेऊन ६,००० रुपये लाचेची मागणी करुन, ती दिल्यानंतरच त्या अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं तक्रारदारास सांगितले. 

या प्रकरणी गुरुवारी, २० मार्च रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक महेश भागवत घाडगे यांनी ६,००० रुपयांची लाच मागणी करुन लाचेची रक्कम ६००० रुपये कार्यालयामध्ये स्वतः स्वीकारली. या प्रकरणी लोकसेवक महेश भागवत घाडगे (रा. मु.पो.शिवणे ता. सांगोला) यांच्याविरुध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, ७ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयातील पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार एएसआय/एस. व्ही. कोळी, पोना/संतोष नरोटे, पोकॉ/गजानन किणगी व चालक पोकॉ१६०८ शाम सुरवसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

नागरिकांना आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.

संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर.

संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in 

ई मेल - www.acbwebmail@mahapolice.gov.in, dyspacbsolapur@gmail.com

ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net

संपर्क टोल फ्री क्रमांक १०६४

दूरध्वनी क्रमांक - ०२१७-२३१२६६८.


To Top