जिल्ह्यातील 4754 अंगणवाडी व 4099 शाळेतील बालकांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत आरोग्य तपासणी

shivrajya patra

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ

सोलापूर : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम २.० विशेष आरोग्य तपासणी मोहिम जिल्ह्यात, 01 ते 31 मार्च 2025 या कालावधीत  राबविण्यात येत असून,  या मोहिमेतंर्गत जिल्हयातील 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

          जिल्हयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या सहकार्याने  मुलांची आरोग्य तपासणी मोहिम ची सुरुवात करण्यात आली.

        सदर मोहिमेचे उद्घाटन राज्यस्तरावरुन उप मुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर, यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यातील 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने मोहीम जिल्हाभर राबविण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत 4754 अंगणवाडी व 4099 शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षा पर्यंतच्या बालकांची/किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया), प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे,  सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणं, हे या मोहिमेचे उद्दीष्ट असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी सांगितलं आहे.

To Top