सोलापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे असून अर्ज भरण्याकरिता शनिवारी, 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली असून विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र व विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आदी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांचेकडून स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी दि. 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या योजनेसाठी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत व यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर लॉग इन करून आपला बँक तपशिल भरावा, असं आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केलंय.
स्वाधार योजनेला मुदत वाढ ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या प्रयत्नांना यश
ज्या अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासकीय हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेची मुदत संपल्याने त्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नव्हते, तसेच या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. या संबंधीच्या तक्रारी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेकडे प्राप्त झाल्याने संघटनेच्या वतीने शासनाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, या उद्देशाने स्वाधार योजनेची मुदत 15 मार्च 2025 पर्यंत केलेली आहे, तरी जे विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहेत, त्यांनी याचा त्वरित लाभ घ्यावा, असं आवाहन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अमर लंकेश्वर यांनी केलं आहे.