रेकॉर्डवरील 'हिस्ट्री शीटर' कचाट्यात; 06 वर्षे पोलीसांना गुंगारा देत अखंडपणे सुरू होती गुन्ह्यांची मालिका

shivrajya patra
सोलापूर : शहर पोलिसांना गेली सहा वर्ष गुंगारा देऊन आपल्या गुन्ह्यांची मालिका अखंडपणे चालू ठेवलेल्या 72 वर्षीय आरोपीस गुन्हे शाखेकडील स. पो. नि. संदीप पाटील व त्यांच्या पथकानं ताब्यात घेतलंय. बाबुलाल कुकरेजा असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडं सदर बझार पोलीस ठाण्याकडील 'हिस्ट्री शीटर' म्हणून पाहिलं जातंय. त्यानं केलेल्या गुन्ह्यातील 14 सायकली हस्तगत करण्यात आल्या. आरोपीची प्रत्येक गुन्ह्यात सायकल निशाण्यावर का असायची हाच तपासातील महत्त्वाचा भाग असल्याचं दिसून येतंय.

भैय्या चौक, चिप्पा चाळ परिसरात वास्तव्यास असलेल्या बाबूलाल कुकरेजा याच्याविरुद्ध 12 दखलपात्र आणि 02 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्यात विजापूर नाका पोलीस ठाण्यात 08 गुन्हे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील 03 गुन्हे, एमआयडीसी, जोडभावी पेठ आणि जेलरोड पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी 01 गुन्हा अशी दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्ह्याची ही मालिका 2019 ते 2025 या काळातील आहे, मात्र तो पोलिसांच्या कचाट्यात आला नव्हता.

19 मार्च रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकानं कूकरेजा यांना ताब्यात घेऊन केलेल्या कौशल्य पूर्ण तपासात कुकरेजा यानं शहरात विविध ठिकाणावरून 14 सायकली चोरल्याची कबुली दिलीय. या सर्व सायकली हस्तगत करण्यात आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितलंय. प्रत्येक गुन्ह्यात आरोपीच्या निशाण्यावर सायकल का असायची हाच तपासातील महत्त्वाचा भाग असल्याचं दिसून येतंय.

ही उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप पाटील, व पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, उमेश पवार, चालक बाळासाहेब काळे यांनी पार पाडलीय.

To Top