सोलापूर विद्यापीठात रक्तदान, अवयवदान संकल्प कार्यक्रम
सोलापूर : अवयवदान काळाची गरज असून एका मेंदू मृत व्यक्तीपासून 06 ते 07 जणांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कोणताही गैरसमज न बाळगता अवयवदानाविषयी नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज असल्याचे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप यांनी व्यक्त केले.
शासनाच्या सूचनेनुसार मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर 'अवयदान' याविषयी डॉ. अभिजीत जगताप यांचे व्याख्यान ही पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा होते. 
कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.
समाजात अवयवदानाविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अवयव दानाविषयी संकल्प देखील करण्याची आवश्यकता आहे. भारतात अवयवदान, देहदान करणाऱ्यांची टक्केवारी खूपच कमी आहे. तुलनेने स्पेन देशात प्रमाण अधिक आहे, असं डॉ. जगताप यांनी सांगितले 
आज अनेक रुग्णांना अवयवदानाची गरज आहे. त्यामुळे याचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे मत डॉ. जगताप व्यक्त करून हृदय, डोळे, लिव्हर, किडनी, आतडी, त्वचा आदी अवयव आपण दान करू शकतो, असंदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्याने विद्यापीठात रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. कुलसचिव योगिनी घारे यांनीदेखील यात सहभागी होत रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, डॉ. अभिजीत जगताप, डॉ. केदारनाथ काळवणे छायाचित्रात दिसत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांनी रक्तदान केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप आणि जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे उपस्थित होते.
