सोलापूरचे युवा चित्रकार रामचंद्र खरटमल यांना ‘शिवशक्ती पुरस्कार’ प्रदान

shivrajya patra

सोलापूर : पुण्यातील भरत मित्र मंडळ, महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्टकडून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात कलेच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा शिवशक्ती पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाच्या 47 व्या महोत्सवाचे ‘शिवशक्ती पुरस्कार 2025’ सोलापूरचे युवा चित्रकार रामचंद्र शिवाजी खरटमल यांना देण्यात आला. 

चित्रकार खरटमल यांना चित्रकला क्षेत्रातील योगदान बद्दल अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वर्षा खरटमल यांचाही सन्मान करण्यात आला. खरटमल यांच्याबरोबर खासदार व अभिनेत अमोल कोल्हे, अभिनेत्री सुप्रिया पाठारे, अभिनेते भाऊ कदम यांनाही यंदाच्या ‘शिवशक्ती पुरस्कार 2025’ पुरस्कार देण्यात आला.

यावेळी भरत मित्र मंडळ, महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्ट,पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, रा. काँ. महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते अंकुश काकडे, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडीया, सिने अभिनेते रजा मुराद, चित्रकार निलेश खराडे, शिल्पकार विवेक खटावकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पुरस्कार प्राप्त चित्रकार खरटमल यांनी आकर्षक ' देवो के देव ' महादेवांचे चित्र रेखाटून मंडळास भेटी दिली. 

पुरस्कार मिळाल्यानंतर खरटमल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘देवादी देव महादेव हे सत्यम् शिवम् सुमंदरम् चे प्रतीक आहे. अशा सत्य शिवाचा पुरस्कार रूपी महाप्रसाद मला नक्कीच ऊर्जा देणारा आहे. भगवान शिव कायम एकांतात आपल्या साधनेत लिन असतात, व्यवहारीक मोहमायापासून अलिप्त आपल्याच विश्वात रमणारे, कोणत्याही कार्य सिद्धीचे अवडंबर न करणारे, कर्मकांडपेक्षा निखळ साधना करणारे, आपल्या शक्ती चा सन्मान करणारे, शिवशक्ती हेच विश्व निर्माणचे गमक आहे, हे जसे सत्य आहे. 

त्याच प्रमाणे दृश्य कलेत अवकाश आणि आकार यातून नवनिर्मितीची सुरुवात होते. हे सर्व मला कुठेतरी कला व कलावंतला मार्गदर्शन ठरणारे समीकरण वाटते. कुठेतरी प्रत्येक कलावंतात शिव दडलेला आहे, असे वाटते. तो फक्त शोधायला हवा. आज या पुरस्कारामुळे हा शोध घेण्याची मला एक प्रेरणा मिळाली’, असे चित्रकार रामचंद्र खरटमल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

To Top