सोलापूर : महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य अभ्यासक जेष्ठ विचारवंत प्रा. गोतमीपुत्र कांबळे यांच्या चिंतनशीलतेतून साकारलेले व एकूणच आंबेडकरी राजकारणाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतील राजकीय घटितांपासून ते थेट एकविसाव्या शतकातील राजकीय घटितांपर्यतचा विश्लेषणात्मक आढावा घेणारे अत्यंत महत्त्वपूर्ण असे 'फुले-आंबेडकरी समकालीन राजकारण' हे पुस्तक आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकावर रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५-३० वा. डाॅ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे.
यामध्ये प्रा. गोतमीपुत्र कांबळे यांच्यासह दै. लोकसत्ता मध्ये प्रदिर्घकाळ गंभीर लेखन केलेले ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील मुलाखतीचे शब्दांकन यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
त्यांच्या प्रदिर्घकाळच्या पत्रकारितेच्या अनुभवातून काढलेले त्यांचे निष्कर्ष महत्वपूर्ण आणि दिशादर्शक आहेत. त्याचबरोबर डाॅ. डी. एस. सावंत यांचा महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघांची विश्लेषणात्मक चिकित्सा करणारा माहितीपूर्ण लेख यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर सतीश पारमित यांचा फुले आंबेडकरी राजकारणातील प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी उभे राहणारे अडथळे, कुंठितता यांची चर्चा करणारा अभ्यासपूर्ण लेख आहे.
महत्त्वाचे म्हणजे परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेले स्वतंत्र मजूर पक्ष, अ. भा. शेड्यूल्ड कास्टस फेडरेशन यांचे निवडणूक जाहीरनामे तसेच रिपब्लिकन पक्ष ध्येय-धोरण स्पष्ट करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय जनतेस लिहिलेले खूले पत्र समाविष्ट केले आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचे हस्ते होणार अहे. तसेच नामवंत ज्येष्ठ आंबेडकरी लेखक योगिराज वाघमारे, स्वत: गोतमीपुत्र कांबळे, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, डाॅ. डी. एस. सावंत (मुंबई), अभ्यासू पत्रकार दत्ता थोरे (सोलापूर) सहभागी होणार आहेत. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक विचारवंत दत्ताजी गायकवाड असणार आहेत.
त्याचबरोबर निवृत्त पोलीस उपायुक्त भरत शेळके, प्रा. एम. आर. कांबळे, अमर सावंत, अॅड. सुनील जगधने, रवी साबळे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आंबेडकरी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारे चर्चासत्र असणार आहे. तरी सोलापुरातील राजकीय सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व अभ्यासकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक अजीत बनसोडे, बाली मंडेपू, प्रशांत गायकवाड, अॅड. उमरजकर, मनीष सुरवसे, बाळासाहेब मागाडे, चंद्रसेन जाधव, युवराज माने यांनी केलं आहे.