शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य निधीसाठी करावं आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर

shivrajya patra

 

सोलापूर : कृषि विभागाच्या सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य निधी अप्राप्त असलेल्या खातेदारांनी, 28 फेब्रुवारी 2025  रोजी पर्यंत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषि विभागाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलं आहे.

सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत 5000 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मर्यादित देण्यात येत आहे. यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई. पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे असे खरीप 2023 कापूस सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत. पात्र शेतकऱ्यांनी ई-पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असलेबाबत खातरजमा  www.scagridbt.mahalt.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडून करुन घ्यावी, तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई. पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे. अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांचेशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी  अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधार संमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र, 28 फेब्रुवारीपर्यंत संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्राचा नमूना कृषि सहाय्यक यांचेकडे उपलब्ध असून,  विहीत मुदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषि विभागास प्राप्त न झाल्याने लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.

अधिक माहितीसाठी नजिकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहनही  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

To Top