सोलापूर : शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात प्रवेश करण्याच्या राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई समोरील प्रवेशद्वाराशेजारचे स्वच्छतागृह हटवण्याची मागणी महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळातर्फे महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडं निवेदनाद्वारे करण्यात आलीय.
सोलापूर शहर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पवित्र झालेले आहे. दरवर्षी मकरसंक्रातीनिमित्त जानेवारी महिन्यात मोठी महायात्रा भरत असते. या यात्रेस कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणासहित संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात.
श्री सिद्धेश्वर मंदिर व मंदिर परिसरात पावित्र्य व स्वच्छता राखणे हे सर्व सोलापूरकरांचे कर्तव्य आहे. परंतु अनेक वर्षांपासून श्री सिद्धेश्वर मंदिराच्या विष्णू घाट येथील राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई समोरील प्रवेशद्वाराशेजारी स्वच्छतागृह आहे. कचराही तिथेच टाकला जातो, परिसरात घाण व दुर्गंधी आहे. त्यामुळे परिसराचं सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आले आहे. 
मंदिरात येणाऱ्या भाविकांना व नागरिकांना या अस्वच्छतेचा त्रास होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून संबंधित स्वच्छतागृह हटविण्याची मागणी श्री सिद्धेश्वर भक्तांकडून होत आहे. हे स्वच्छतागृह हटविण्याची कार्यवाही तातडीने करावी, असा मजकूर या निवेदनात आहे.
यावेळी गंगाधर झुरळे, विजयकुमार बिराजदार, सोमनाथ खोब्बु, नागेश हौसे, गौरीशंकर बाळशेट्टी, महादेव यलशेट्टी, रामचंद्र राजमाने, पिनू करपे, नागेश गडगे आणि यशवंत चव्हाण उपस्थित होते.
फोटो ओळी : महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन देताना महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहेत.
