औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर; साखळीतील 'मुखिया' सह १३ आरोपी गजाआड

shivrajya patra

मिरज : वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री आणि साठा करणाऱ्या राज्या-परराज्यातील टोळीतील १३ जणांना सांगली पोलिसांनी गजाआड केलंय. या टोळीतील अटकेतील आरोपींमध्ये सांगली जिल्ह्यातील ५, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील ५, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एका आरोपीचा समावेश आहे. या टोळीकडून लाखो रुपयांचा 'मेफेनटर्माईन सल्फेट' चा औषधी साठा जप्त करण्यात आलाय. या साखळीतील प्रमुख आरोपी इंतजार अली जहीरुद्दीन याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलंय. त्यास न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.

वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन नशा करण्यासाठी पुरवणारी टोळी मिरज, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात कार्यरत असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर मॅडम (सांगली), उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा (मिरज विभाग) यांना मिळाली होती. 

त्यांच्या सुचनांप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना तात्काळ कारवाई करण्यासंबंधी सुचित केले होते. त्यानुसार डीबी पथक आणि पोलीस ठाण्याकडील अधिकारी-कर्मचारी यांचं संयुक्त पथक नेमण्यात आले होते. या पथकानं  वैद्यकीय वापराचे औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री, साठा करणाऱ्या इसमांसंबंधी माहिती उपलब्ध करुन त्यांच्यावर कारवाई केलीय. 

२०, जानेवारी रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोना राहुल क्षिरसागर यांना मिळाले माहितीवरुन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाने कारवाई करीत सांगली, मिरज परिसरामध्ये वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री, साठा करणाऱ्या लोकांवर कारवाई करीत प्रारंभी ०३ जणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेनटर्माईन सल्फेट या १५०७ इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत १४,४६,६४१ रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील अधिकारी-अंमलदारांची वेगवेगळी ०२ पथके तयार करुन गुन्ह्यातील अन्य संशयितांचा शोध घेणे सुरू होते.

पोलीस कोठडी कालावधीमध्ये अटक आरोपींकडे ' कौशल्य ' पूर्ण तपास करीत गुन्हयातील वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड करीत सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील संशयित १२ जणांना गजाआड केलंय. 

या तपासात त्यांचा मुखिया उत्तर प्रदेशात बसल्याची माहितीही पुढं आली होती. आरोपी अशपाक पटवेगार हा नशेसाठी इंजेक्शन काळ्या बाजारातून अवैध मार्गाने उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथून आरोपी इंतजार अली जहीरुद्दीन (रा. खलीलपूर, ता. कांठ) याच्याकडून मागवून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले.

या माहितीच्या आधारे मुख्य आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा (मिरज विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ०१ पोलीस पथक उत्तरप्रदेशात मुरादाबाद येथे रवाना झाले. या पथकाने संशयित आरोपी इंतजार अली जहीरुद्दीन यास शिताफीने ताब्यात घेऊन मुरादाबाद न्यायालयासमोर हजर करुन त्याचे ट्रान्झीट रिमांड घेऊन सांगली येथे आणण्यात आले.

या गुन्ह्यात आरोपी इंतजार अली जहीरुद्दीन यास मिरज न्यायालयासमोर हजर करुन गुन्ह्यातील तथ्यांच्या आधारे तपासाकामी पोलीस कोठडी देण्यासाठी विनंती केली. न्यायालयानं गुन्ह्याच्या तपासातील प्रगती पाहून गुन्ह्याच्या तपासकामी मुख्य संशयित इंतजार अली जहीरुद्दीन याची ०७ फेब्रुवारी रोजीपर्यंत ०३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलीय. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

... हे आहेत संशयित आरोपी  !

संशयित आरोपी रोहीत अशोक कागवाडे (वय-४४ वर्षे, रा. शामरावनगर, सांगली), ओंकार रविंद्र मुळे (वय-२४वर्षे, रा. गर्व्हमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली), अशपाक बशीर पटवेगार (वय- ५० वर्षे, रा. असूबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर, सांगली), वैभव ऊर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे (वय-२७ वर्षे, रा. भारती बझारजवळ, कडेगाव, ता. कडेगांव जि. सांगली), ऋतुराज आबासाहेब भोसले (वय-२७ वर्षे, रा. पवार कॉलनी, सांगलीवाडी ता. मिरज), अमोल सर्जेराव मगर (वय-२८ वर्षे, रा. निमगांव, ता. माळशिरस जि. सोलापूर), साईनाथ सचिन वाघमारे (वय- १९ वर्षे, रा. निमगांव, ता. माळशिरस), अविनाश पोपट काळे (वय-२२ वर्षे, रा. विझोरी, ता. माळशिरस), देवीदास शिवाजी घोडके (वय-३३ वर्षे, रा. माळशिरस), आकाश अंकुश भोसले (वय-२३ वर्षे रा. बिजवडी ता. माण जिल्हा. सातारा) हणुमंत पांडुरंग शिंदे (वय २४ वर्षे रा. दसुर ता. माळशिरस) आणि ललीत सुभाष पाटील (वय-२३ वर्षे, रा. आरुळ ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर) यांना गुन्ह्याच्या तपासात यापूर्वीच अटक करण्यात आलीय.


To Top