मोहोळ : मी आमदार झाल्यापासून यांची मुरूम उपसा करणारी वाहन तहसिलदार यांना सांगून जप्त केली. पोकलेन जप्त केले, हजार दीड हजार ब्रास दिवसाला मुरुमाचा उपसा करण्याचे काम या लोकांनी केलेले आहे. अनगरकरांची जिरवली, आता कोण झारीतील शुक्राचार्य आहे, त्यांना सांगा... आता माझ्याशी गाठ आहे, मी आमदार राजू खरे बोलतोय ! असं प्रतिपादन मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केलं.
मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोड येथे आमदार राजू खरे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राजू खरे, उमेश पाटील यांचा क्रेनने भला मोठा हार घालन सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेश पाटील, शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष चरण चवरे, पद्माकर देशमुख, बाळासाहेब गायकवाड, रमेश बारसकर, विक्रम देशमुख, राहुल क्षीरसागर, मंगेश पांढरे, युवराज ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
एक आमदार तुमच्याकडे होता, मोहोळचा बाजार, सब रजिस्टर ऑफीस, अप्पर तहसिल कार्यालय, आणखी काय-काय नेणार ? असा विचारणा करून मोहोळच्या जनतेने काय केले होते, असा सवाल करुन, ' तुम्ही दादागिरी कराल तर याद राखा, खंडाळ्याचा बोगदाही उतरु देणार नाही, असा सज्जड दम आमदार राजू खरे यांनी माजी आ. पाटील यांना त्यांचं नाव न घेता दिला.
मी नरखेड, पेनूर, शेटफळचे लोकच आमदार नाही, तर एकशे चव्वेचाळीस गावातील मतदार हा आमदार आहे. मला सोबत काय न्यायचे नाही, मात्र पुढील काळात मतदार संघात कायद्याचे राज्य असेल. रात्री १२ नंतरही माता-भगिनी प्रवास करतील. विकी देशमुख यांच्याकडे पहात, आम्ही तुमची केस परत ओपन केलीय. तालुक्याच्या विकासासाठी बलिदान दिलेल्या शिवसैनिकांचा हा विजय आहे, असेही खरे म्हणाले.
राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे माजी प्रवक्ते उमेश पाटील यांनीही खरपूस समाचार घेतला ते म्हणाले, ' दादा मला बोलले ते माझे मोठे बंधू आहेत, ते बोलले म्हणून काय झाले ? निवडणूक झाल्यानंतर त्यांनाही कळले गाडी खाली कुत्रे नव्हते, तो तर वाघ निघाला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विकास जाधव यांनी केले तर युवराज ढेरे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
याप्रसंगी या भागातील जयसिंग आवताडे, राहुल व्यवहारे, डॉ. झेंडगे, विकास जाधव, युवराज ढेरे, जगन्नाथ भोसले, प्रदीप हावळे, शरद गवळी, तुळशीराम हावळे, लखन फडतरे, विकास कांबळे, महेश हावळे, अंबादास ढेरे, मच्छिंद्र वाघमारे, बाळासाहेब पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.