हजारो भाविकांनी केले संगमावर शाही स्नान
सोलापूर : महाशिवरात्रीनिमित्त हत्तरसंग कुडल (दक्षिण सोलापूर) येथे नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुधवारी दि. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भक्तीमय वातावरणात संगम आरती करण्यात आली. प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते संगम आरती करण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर या दाम्पत्यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आले.
दरम्यान यंदा 144 वर्षनंतर आल्यानंतर प्रयागराज येथे असलेल्या कुंभमेळ्यामुळे कुडल भीमा- सीना संगम नदीच्या पवित्र स्थळी हजारो भाविकांनी सकाळपासूनच स्नानासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. प्रारंभी संगमेश्वर मंदिरापासून ते संगम घाटापर्यंत संबळाच्या निनादात आरती आणण्यात आली.

महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची पहाटे पाच वाजल्यापासूनच रांग लागली होती. बहुमुखी शिवलिंग, संगमेश्वरांचे शिवलिंग, पंचमुखी परमेश्वर शिवलिंगास बिल्वरचन पत्र अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
तसेच मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान समिती आणि आडत व्यापारी मल्लिकार्जुन बिराजदार यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. बिराजदार हे गेल्या 22 वर्षापासून हे महाप्रसाद व्यवस्था करत आहेत.
संगम आरतीस चनगोंडा हविनाळे, संगप्पा केरके, मधुकर बिराजदार, अण्णाराव पाटील, मल्लप्पा पाटील, चन्नप्पा बगले, बाबुराव पाटील, पंडीत पुजारी, देविन्द्रप्पा पाटील, आडत व्यापारी मल्लिनाथ बिराजदार, हणमंत बगले आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : हत्तरसंग कुडल संगम येथे संगम आरती करताना आ. सुभाष देशमुख, सुरेश निंबाळकर यांच्यासह अन्य मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.
