सोलापूर : बार्शी तालुक्यातील बाभूळगाव येथे एका इसमाचा खून करून त्याचे प्रेत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बार्शी तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक करून या गुन्ह्याचा छडा लावला. दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि राहूल नागेश गायकवाड अशी आरोपींची नाव आहेत. उभयतांना बार्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात दिलीय.
बार्शी तालुक्यातील बाभुळगाव चे रहिवासी सुरेश रंगनाथ शिंदे (वय-68 वर्षे) हे 17 फेब्रुवारी रोजी बार्शी येथून आपल्या गावी जात असताना अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही मागमूस लागला नाही. अखेर 20 फेब्रुवारी रोजी दुपारी बाभूळगाव शिवारातील गट नं. 165 मध्ये ऊस लागवडीच्या शेतात एका शेतकऱ्याला मानवी पाय दिसला. माहिती मिळताच पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शव बाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवली. मृतदेहाचे दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते आणि गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या.
पोलिसांनी तात्काळ खून आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बाभूळगाव आणि आगळगांव परिसरातील नागरिकांची कसून चौकशी केली असता, गोपनिय माहितीच्या आधारे शेजारी राहणारा दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि बाभूळगावात सालगडी म्हणून काम करणारा राहूल नागेश गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) यांचा सहभाग असल्याचा संशय बळावला. प्राथमिक चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
उभयतांनी सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्यांच्याजवळील रोख रक्कम मिळवण्यासाठी कट रचला. त्यानंतर गळा आवळून खून केल्यावर खूनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत ऊसाच्या शेतात पुरले. तांत्रिक तपासातूनही या दोघांचा गुन्ह्यात सहभाग सिद्ध झाला.
दोन्ही आरोपींना अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक अभियोक्ता श्री. सोनवणे यांनी युक्तिवाद केला. तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलिसांनी केला. प्रभारी अधिकारी दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पो.हे.कॉ. राजेंद्र मंगरुळे, अभय उंदरे, धनराज केकाण, सागर शेंडगे, राहूल बोंदर, सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड यांनी या तपासात महत्वाची भूमिका बजावली.
बार्शी शहर पोलीस ठाणे आणि सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपींना तांत्रिक आधारावर शोधून काढण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, एएसआय अजित वरपे, पोकॉ धनराज फत्तेपूरे, रतन जाधव यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.