सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अंतर्गत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज -2 या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.
केंद्र सरकारने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्ये विषयक जनजागृती करण्याची निर्देश दिलेले आहेत. बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आहारातून पौष्टिक तृणधान्याचा वापर कमी होत चालला आहे. मुलाचा आहार कर्बोदके, प्रथिने जीवनसत्वाची समृद्धी असणे आवश्यक आहे. ही गरज तृणधान्यांमधून भागवणे शक्य आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तृणधान्य आहाराची सवय लावणे आवश्यक आहे.
याकरिता तृणधान्यापासून निर्मिती विविध पाककृतीचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळेपण मिळेल व आहार विद्यार्थी आवडीने खाऊ शकतील याच हेतूनंही पाककृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तालुक्यातील शाळांनी सहभागी होऊन विविध पदार्थ प्रदर्शनात ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला उत्तर सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत ऐवळे, विस्तार अधिकारी तथा अधीक्षक बापूराव जमादार, सारंग पाटील, परशुराम कोळी, सिद्धाराम माशाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय पोषण आहाराचे महताब शेख यांनी केले.
यावेळी शालेय पोषण आहार अधीक्षक बापूराव जमादार यांनी सध्याच्या बदलत्या जीवनपद्धती आणि फास्टफूड च्या काळात मानवाच्या आरोग्यावर त्यांचा परिणाम पडताना दिसतोय, त्याचबरोबर या काळात हेल्दी तृणधान्य पिकाचे आहारातील महत्व ही कमी दिसतं. नवीन पिढी तृणधान्याचे महत्त्वही माहीत नाही, मात्र तृणधान्य हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. त्यांचा आहारात समावेश करावा, असे मत व्यक्त केले.
उत्तर सोलापूर आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आहारात तृणधान्याचा जास्तीत जास्त वापर करावा व तालुक्यांनी या स्पर्धेसाठी जास्तीत-जास्त शाळांनी सहभाग घ्यावे व शिक्षकांनी मुलांना त्यांचे महत्त्व पटवून द्यावं, असे मत त्यांनी याप्रसंगी केले.
या तालुक्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आणलेल्या तृणधान्यापासून निर्मिती विविध खाद्यपदार्थ परीक्षण परीक्षकांनी केले.
पाककृती स्पर्धेमध्ये नाचणीची इडली, नाचणीचा चिवडा, नाचणीचा डोसा, ज्वारीची उसळ, नाचणीची बर्फी, ज्वारीची उसळ, सोयाबीनची बिर्याणी, बाजरीची भाकरी, ज्वारीची चकल्या, गव्हाच्या कोंड्यापासून मुटके, ज्वारी-मका-गव्हाच्या पिठाचे थालीपीठ, नाचणीचा शिरा, तांदळाची भाकरी, ज्वारीचे वडे, गव्हाची खीर आदी पदार्थ तृणधान्याचा वापर करून स्पर्धकांनी बनवून आणल्या होत्या.
पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज -2, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेवाडी यांनी पटकविला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम माशाळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
