सोलापूर : जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरातील नियोजन भवन येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाल,श्रीफळ- बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातील विविध प्रश्न निश्चितच मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी संभाजी ब्रिगेडला दिले.
सोलापूरच्या पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना म्हणून उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामास तात्काळ गती मिळावी, गेल्या दहा वर्षापासून सोलापूरकर दोन उड्डाणपूलाच्या प्रतिक्षेत आहेत त्याचे काम आपल्या हातून लागावे मार्गी, जुळे सोलापूर भागाला जोडणारा आसरा पुलाची रुंदीकरणाचे काम निधी असून सुद्धा रेल्वे प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्यामुळे रखडलेले आहे, त्याबाबत संबंधित विभागांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात यावा, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सिटीस्कॅन- एम आय आर मशीन बंद असल्यामुळे गोरगरीब रुग्णांचे होणारे हाल आणि आर्थिक भार थांबवावा, अशा मागण्यांचे निवेदन गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे पहिल्यांदा सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर शहरातील अनेक समस्या निवेदन रूपाने पालकमंत्री गोरे यांच्यापुढे मांडल्या.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात सोलापूर विमानतळावरील विमान सेवा तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न, सोलापूर विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण, सर्वसामान्यांना परवडणारी सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा नव्या उमेदीने रस्त्यावर आणणे, डान्सबार, मटका-जुगार आणि अवैध धंद्याचं समूळ उच्चाटन करणे यासह १३ मागण्यांचं निवेदन पालकमंत्री गोरे यांना देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा संपर्कप्रमुख शत्रुघन माने, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद आदि उपस्थित होते.