Type Here to Get Search Results !

कर आकारणीस नावाची नोंद करण्यासाठी स्विकारली २८,७४५ रुपये लाच; वरिष्ठ लिपिकाविरूध्द गुन्हा नोंद

सोलापूर : महानगरपालिका हद्दीमध्ये नोटरी पध्दतीने खरेदी केलेल्या ३००० स्क्वेअर फुट जागेची कर आकारणीस नावाची नोंद करण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच रक्कमेची मागणी करून २८,७४५ रुपये लाच रक्कम स्वरुपात स्वतः करीता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनीक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलंय. हा खळबळजनक प्रकार गुरूवारी सोलापूर महानगरपालिकेत घडलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदाराने महानगरपालिका हद्दीत 1992 मध्ये नोटरी पद्धतीने 3000 स्क्वेअर फिट जागा खरेदी केली होती. त्या जागेची महानगरपालिकेत नोंद करून करपावती घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर अर्जदार त्या अर्जाचा पाठपुरावा करीत होते.

त्यासाठी अर्जदाराने सोलापूर महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागातील मुख्य वरिष्ठ लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोंतुल, यांची भेट घेतली होती. त्यावेळी चंद्रकांत दोंतुल यांनी तक्रारदार यांना त्यांनी खरेदी केलेल्या जागेचा ०१ एप्रिल१९९२ पासुन ते ३१ मार्च २०२५ पावेतोचा कायदेशीर कर १,७७,७४५  रुपये भरण्यास सांगितले.

त्या पुढे जाऊन तेवढा कर भरायचा नसेल तर ५०,००० रुपये देण्यास सांगून, त्यामधून ०१ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च २०२५ पावेतोचा कर भरल्याची पावती देतो, असे सांगून तक्रारदार यांच्याकडून ५०,००० रुपयांचा स्विकार  केला. त्यापैकी २१,२५५ रुपयांची ऑनलाईन कर भरल्याची पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत २८,७४५ रुपये लाच रक्कम स्वरुपात स्वतः करीता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनीक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलंय. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी काम पाहिलंय.

ही कारवाई एसीबी चे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोहेकॉ अतुल घाडगे, सलिम मुल्ला, स्वामीराव जाधव, पोशि राजू पवार, चापोह/राहुल गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

वरिष्ठ मुख्य लेखनीक चंद्रकांत दोंतूल ( रा. घर नंबर १०११ / १०१२ भाग्यनगर, प्रगती चौक, जुना विडी घरकुल सोलापूर) यांच्याविरूध्द सदर बझार पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

... नागरिकांना आवाहन ...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असं एसीबीचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी म्हटलंय.

संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज, रंगभवन चौक, सोलापूर.

संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in

ई-मेल- www.acbwebmail@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार अॅप- acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक १०६४

दुरध्वनी क्रमांक- ०२१७-२३१२६६८

व्हॉटस अॅप क्रमांक- ९९३०९९७७००