Type Here to Get Search Results !

सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री यांच्या सात सुत्री कार्यक्रमांची करावी प्रभावी अंमलबजावणी : कुमार आशीर्वाद


कार्यालय परिसर व कार्यालयाची स्वच्छता ठेवावी, तर नागरिकांच्या तक्रारींचा करावा वेळेत निपटारा

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकारी यांना 100 दिवस उद्दिष्टपूर्ती बाबत 7 सूत्री कार्यक्रम दिला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेखी सूचना यापूर्वीच निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनिस्त कार्यालयात पुढील शंभर दिवसात या सात सुत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री यांच्या सात सुत्री कार्यक्रमाची शंभर दिवसात उद्दिष्ट कृतीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलीस उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, सोलापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन कवळे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विना पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसात उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी आपली वेबसाईट अद्यावत करणे, कार्यालय परिसर व कार्यालयाची स्वच्छता करणे, इज ऑफ लिविंग, कार्यालयात अभ्यागतासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, जनतेच्या तक्रारीचा निपटारा वेळेत करणे, गुंतवणूकीस प्रोत्साहन देणे व प्रत्येक अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोन दिवस फील्ड व्हिजिटवर जाणे अशा प्रकारची सात सुत्री दिलेली आहे. या सात सूत्री मधील प्रत्येक बाबीवर संबंधित विभाग प्रमुखांनी अत्यंत काटेकोरपणे कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे व हा सात सुत्री कार्यक्रम पुढील शंभर दिवसात यशस्वी होईल यासाठी योग्य अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

कार्यालयातील अभिलेखे व्यवस्थित असले पाहिजेत, यासाठी सिक्स बंडल सिस्टीम वापर करावा. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने याच आठवड्यात प्रत्येक कार्यालयातील तीन अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. आपले सरकार पोर्टलवरील तसेच नागरिकांच्या अन्य तक्रारींचा निपटारा वेळेत झाला पाहिजे. प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी तक्रारीचा निपटारा व्यवस्थितपणे होत आहे का नाही, याची खात्री स्वतः करावी. अभ्यांगताना भेटण्याचा दिवस व वेळ ठरवून घेऊन त्याचा फलक दर्शनी भागात लावावा. माहे फेब्रुवारी 2025 च्या लोकशाही दिनापासून प्रत्येक विभाग प्रमुखांनी लोकशाही दिनात आपली उपस्थिती लावून आलेल्या तक्रारींचा निपटारा करावा. गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती लवकरच गठित करण्यात येणार आहे. तसेच कार्यालय प्रमुखांनी आठवड्यातून दोन वेळा फिल्ड व्हिजिट करावी व त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवावे, अशी सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केली.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसाच्या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने सात सुत्री कार्यक्रमाची अत्यंत सविस्तर माहिती देऊन प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी करावयाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच लोकसेवा हक्क अधिनियम, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा, माहितीचा अधिकार, कार्यालयीन स्वच्छता, अभयागतांसाठी सोयी सुविधा, कामाच्या ठिकाणी लैंगिक शाळा प्रतिबंध अनुषंगाने समितीची स्थापना आदी बाबीची पूर्तता झाली आहे, याबाबतचे प्रमाणपत्र प्रशासनाला 27 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावेत, असेही त्यांनी सूचित केले.