सोलापूर : स्त्री शिक्षणाच्या आद्य देवता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्तर पंचायत समिती शिक्षण विभाग व यमाई देवी प्राथमिक आश्रम शाळेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, ०३ जानेवारी रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा यांचा किशोरी मेळावा यमाई देवी प्राथमिक आश्रम शाळेमध्ये घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शाळेचे केंद्रप्रमुख , सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालकांचे स्वागत केले. 'काही छबी...अप्रतिम' असा आजचा हा उपक्रम होता. याप्रसंगी मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी नृत्य, गायन, वक्तृत्व, पेंटिंग, रांगोळी, पोस्टर प्रदर्शन यात अनेक विद्यार्थीनींनी यामध्ये सहभागी नोंदवत स्वतःचं कौशल्य प्रस्थापित केले. तसेच विविध क्षेत्रातील स्वतःचे वर्चस्व निर्माण केलेल्या 'सावित्रीच्या लेकी' ची मुलाखत याप्रसंगी घेण्यात आली. भरगच्च असा आनंदाचा मेवा याप्रसंगी मुलींना देण्याचे काम उत्तर पंचायत शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आले.
संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळच्या अध्यक्षा सौ. सुरेखा लामतुरे, संस्थापक अध्यक्ष अशोक लामतुरे , सचिव मधुकर गवळी, संगिता जाधव, विस्तार अधिकारी जमादार, उपस्थित होते.
