सोलापूर : तरूणास दुचाकीवर बसवून नेऊन स्टीलच्या स्टॅंडने डोक्यावर आणि चेहऱ्यावर प्रहार करून हत्या करण्यात आलीय. ही खळबळजनक घटना शेळगी परिसरातील निर्मल डेव्हलपर्सने विकसीत केलेल्या प्लाटींगच्या मोकळ्या पटांगणात शनिवारी रात्री १०.३० वा. च्या सुमारास घडलीय. युवराज प्रभुलिंग स्वामी (वय-२० वर्षे) असं मृताचं नांव आहे. त्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी विजय ऊर्फ सोनु बनसोडे याच्यासह दोघांविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर शहरातील आदर्श नगरातील रहिवासी विजय उर्फ सोनू बनसोडे आणि त्याचा मित्र सुजल मरबे असे दोघांनी मिळून शनिवारी रात्री, युवराजला घरापासून त्यांच्या मोटार सायकलवर बसवून घेऊन मित्र नगर, शेळगी येथील निर्मल डेव्हल्पर्स यांच्या मोकळ्या जागेमध्ये घेऊन जाऊन पाठीमागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्या मोकळ्या प्लॉटचा नंबर दर्शविण्यासाठी वापरलेल्या स्टिल च्या स्टॅण्डने युवराजच्या कपाळावर, डोळ्यावर, डोक्यात तसेच तोंडावर जोरात मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारले.
याप्रकरणी मृताचा भाऊ नागेश प्रभुलिंग स्वामी (वय-१८ वर्षे, रा- घर नं. ४८ शिवगंगा नगर, राजु आलुरे यांच्या घरामागे शेळगी) याच्या फिर्यादीनुसार विजय ऊर्फ सोनु बनसोडे आणि सुजल मरबे (रा-थोबडे नगर, शेळगी) या आरोपींविरुध्द रविवारी ०४: ११ वा. भा. न्या. सं. क १०३ (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मदुपोनि शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.