मोहोळ : प्रथम डोक्यात वारंवार हातोड्याचे प्रहार करून हत्या... त्यानंतर धार-धार हत्याराने केले शरीराचे तुकडे... ते तुकडे वेगवेगळ्या पॉलीकॅप कॅरीबॅगमध्ये भरण्यापर्यंतची मजल... कॅरीबॅगमध्ये भरलेल्या मृताच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाच्या शोष खड्डयाचा वापर ... हे वाचतानाही कोणाच्या अंगावर शहारे येणे स्वाभाविक आहे. हा एखाद्या भयपटात रेखाटलेला काल्पनिक प्रसंग नसून मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी इथं घडलीय. या अमानुष हत्येच्या मृताच्या सालगड्याला गजाआड करण्यात आलंय.
सोन्या-चांदीचा मोहापायी सालगडी सचिन भागवत गिरी या तरुणानं मालक कृष्णा नारायण चामे या ५२ वर्षीय इसमाची थंड डोक्यानं निर्दयी पध्दतीनं हत्या केली. मृतदेहाचे तुकडे शौचालयाच्या शोषखड्यात पुरून ठेवले. तसेच मृताच्या अंगावरील सुमारे १८-१९ तोळे सोने, लॉकेट, अंगठ्या व सोन्याचे कडं असा ऐवज त्यांने मृताच्या घरासमोरील खड्ड्यात पुरल्याचंही सांगितलंय.
सर्वसामान्यांचा अंगावर शहारे आणणाऱ्या हत्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आलंय. कृष्णा नारायण चामे असं मृताचं नाव आहे. त्याची हत्या सालगडी म्हणून कामास असलेल्या सचिन भागवत गिरी (वय २५ वर्षे, सांगवी, जि. धाराशिव) यानं सोन्याच्या लोभापायी केल्याचा कबुलीजवाब दिलाय. त्यानं या गुन्ह्याची असली तरी या अमानुष हत्येत आणखी कोणी सहभागी आहेत किंवा कसं या अंगाने पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले.
या घटनेची अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथील कृष्णा नारायण चामे, १५ डिसेंबर रोजीपासून यल्लमवाडी येथून मिसींग असल्याची मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद होती. या मिसींगच्या ०३ दिवसाच्या तपासात सर्वत्र मिसींग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेतला तसेच मिसींग व्यक्तीची सर्व जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यास तपास यादी पाठवून मिसींग व्यक्तीचे मोबाईलचा सीडीआर काढून त्याचे अवलोकन केले, पंरतु या मिसींग व्यक्तीसंबंधी काही एक माहीती मिळून आली नाही.
या मिसींग प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मिसींग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. च्या अपहरणाचे तपासात अपहृत व्यक्ती कृष्णा चामे यांच्या शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी याच्याकडून माहिती मिळाली की, अपहृत चामे एका अज्ञात व्यक्तीनं मोटार सायकलीवर घेऊन गेल्याची माहिती दिली.
या प्रकरणातील कृष्णा चामे याचे घर हे शेतामध्ये फॉरेस्टला लागून आहे. त्या घराच्या आसपास साधारणतः ०५ ते ०६ किलो मिटर अंतरापर्यंत शेती व फॉरेस्टची जमीन आहे. त्यामुळे सदर ठिकाणी राहती लोकवस्ती अगर सीसीटीव्हीसारखी तांत्रिक मदत तपास अधिकाऱ्यांना मिळत नव्हती.
तरी देखील घटनेच्या ०५-०६ किलोमिटर क्षेत्राचे बाहेरील रोडवर जाऊन सीसीटीव्ही चेक करण्यात आली, परंतु उपयुक्त माहिती मिळत नव्हती. अपहृत व्यक्ती कृष्णा चामे यांचा मोबाईल देखील घरीच मिळून आलेला होता. त्याचा सीडीआर काढून सर्व संशयीत व्यक्तीचा अभ्यास केला असता, गुन्ह्याची तपास उपयुक्त माहीती मिळून येत नव्हती. तपास अधिकारी प्रत्येक शक्यता पडताळून पाहात होते.
अपहृत कृष्णा चामे व त्याच्या कुटुंबियांचे बॅंक स्टेटमेंन्ट व अन्य लोकांसोबतच्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास केला असता, अपहृत व्यक्तीचे आस-पासच्या १० ते १२ गावात आर्थिक व्यवहार असल्याचे दिसून आले. त्या सर्व लोकांकडे या संबंधी तपास केला, पंरतु त्यातूनही गुन्ह्याच्या तपासयुक्त काहीही निष्पन्न झालं नाही.
अपहृत कृष्णा चामे यांचा फोटो प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारीत करून आसपासच्या सर्व गर्दीच्या ठिकाणी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, हॉटेल, या ठिकाणी अपहृत व्यक्तीचे फोटो प्रसिध्द केले. तसेच घटनेच्या ठिकाणचे आसपासचे सर्व नदी-नाले, विहीरी, कॅनाल व फॉरेस्ट अशा आसपासच्या सर्व ठिकाणी शोध घेतला असता, तपास पुढं सरकला नाही अथवा अपहृत कृष्णा चामे मिळून आला नाही.
अशा प्रकारे सलग पाच दिवस अपहृत व्यक्तीचा तपास करून देखील काहीही भरीव माहिती मिळाली नाही. मात्र अपहरण व्यक्तीच्या शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन भागवत गिरी याच्या चौकशीत विसंगती समोर येत होती.
तेव्हा सचिन गिरी याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता, हा गुन्हा त्यानं आर्थिक कारण आणि सोन्याच्या लोभातून स्वतः केल्याची कबुली दिलीय. आरोपी सचिन भागवत गिरी याच्याविरूध्द धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलीस ठाणे येथे यापूर्वी चोरीविषयक ०३ गुन्हे असल्याचा अभिलेख मिळून आलेला आहे.
सर्वत्र खळबळ उडवून देणारी हत्या त्यानं एकट्यानेच केली असल्याचं तो सध्या सांगत असला तरी या गुन्ह्यात त्याच्याबरोबरच आणखी कोणी आहेत किंवा कसे हे अधिक तपासात उजेडात येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आरोपी सचिन भागवत गिरी (वय २५ वर्षे, रा. सांगवी, जि. धाराशिव) यास गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आलीय. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने करीत आहेत.
ही लक्षवेधी कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर (सोलापूर ग्रामीण), उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार (अक्कलकोट उपविभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर (सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजित माने, सहा. पोलीस निरिक्षक किरण पाटील, पोलीस उपनिरिक्षक गजानन कर्णेवाड, अजय केसरकर, डी. बी. पथकातील पोहेकॉ/दयानंद हेंबाडे, पोहेकॉ/संदेश पवार, पोना/चंद्रकांत ढवळे, पोकॉ/अमोल जगताप, संदीप सावंत, अविराज राठोड, पोलीस ठाणे कडील पोहेकॉ/समाधान पाटील, संतोष चव्हाण, पोकॉ/धनाजी घोरपडे, कैलास डाखोरे, चापोकॉ/श्रीशैल्य शिवणे, हरी आदलिंगे, अनिल वाघमारे व डी.वाय. एस.पी. कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप झालटे, पोहेकॉ/शरद डावरे, अशपाक शेख, पोकॉ/ देवा सोनवलकर यांनी बजावलीय.