ॲड. जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन
सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
सोलापूर : जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे, याच अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी व त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसेच आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा. आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत अत्यंत गतिमान पद्धतीने पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
माजी प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेप्रमाणे 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्हास्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न येता त्यांच्या तक्रारी त्यांना योग्य पद्धतीने करता येतील व त्याचा वेळेत निपटारा होऊन त्यांना समाधान मिळेल व गतिमान पद्धतीने शासनाचे काम होईल याकरता आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी आपले सरकार पोर्टलवर आलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारींची अत्यंत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्याचा वेळेपूर्वी निपटारा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे की नाही, याबाबत खात्री करण्यासाठी एका एजन्सीमार्फत दररोज किमान 1 ते 2 हजार नागरिकांना फोन कॉल करण्यात येतील व त्यांना मिळणाऱ्या योजनेविषयी माहिती घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सुशासन सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली तसेच आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. तर या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मानले.