सोलापूर : आजच्या युवकांनी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला साजेल, असे नववर्षाचे स्वागत करावं, या उद्देशाने दरवर्षी 'दारू नाही, दूध प्या' हा उपक्रम संभाजी ब्रिगेडच्या वतीने, ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात राबविण्यात येत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी दिलीय.
सरत्या वर्षाला निरोप देताना, आजची तरुणाई ओल्या रात्री पार्ट्या करून मद्य सेवन करुन झिंगाट वाहने चालवताना आढळते. अशा घटनांत दुर्घटना होऊन अनेक जण जायबंदी होतात. हे प्रकार टाळण्यासाठी तसेच तरूणाईला नव्या वर्षाच्या आगमनात नवा संदेश देण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात 'दारू नाही, दूध प्या' हा उपक्रम राबविला जातोय.
नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली होणारं पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण हे अनुचित आहे. हा संदेश तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचा आहे, या उपक्रमात तरुणाईला दूधाचा प्याला देण्याबरोबरच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहे.
दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे युवकांनी दारू न पिता दूध पिऊन व्यायाम करणे गरजेचे आहे, सदृढ शरीर संपत्ती व उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, असंही श्याम कदम यांनी म्हटलंय.