सोलापूर : कर्तव्य संपवून मुंबई-चेन्नई एक्सप्रेस ने परतीच्या प्रवासाला असलेल्या पोलीस हवालदाराच्या सतर्कतेमुळे दोन चोरट्यांना गजाआड करण्यात आलंय. उभयतांच्या ताब्यातून जवळपास सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. हा थरारक प्रकार शनिवारी, सायंकाळी बाळे रेल्वे स्टेशन येथे घडलाय. महिलेचा पर्स चोरीचा आरडा-ओरडा ऐकून पोलीस हवालदाराने पाठलाग करून २ चोरट्याना पकडलंय. दुर्योधन गुलाब कांबळे असं या धाडसी रेल्वे पोलिस हवालदाराचं नांव आहे.
कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार दुर्योधन कांबळे (बक्कल नंबर 301) हे शनिवारी, 28 डिसेंबर रोजी त्यांचे कर्तव्य संपवून, गाडी क्रमांक 22157 मुंबई चेन्नई एक्सप्रेस या गाडीने निवासस्थानी जात होते. ही गाडी 06.55 वा. बाळे रेल्वे स्टेशन येथे मेन लाईनवर थांबलेली असताना त्यांना बोगी क्रमांक B1 मधून एका प्रवासी महिलेचा पर्स चोरी झाले बाबतचा आरडा-ओरडा ऐकू आला.
पोलिस हवालदार कांबळे यांनी लगेच बोगीचा दरवाजा उघडून बाहेर कोणी दिसते का पाहिले असता, त्यांना दोन तरुण इसम पाठीमागील दरवाज्यातून उतरून दोन ते तीन एसी चे डबे सोडून रिझर्वेशन बोगीमध्ये चढताना दिसले.
पोलीस हवालदार कांबळे यांनी वेळ न दवडता लगेच त्यांचा पाठलाग करून रिझर्वेशन चे सर्व डबे चेक करत शेवटी S 9 बोगी मध्ये त्या दोन्ही चोरांना मुद्देमालासह रंगेहात पकडले. दोन्ही संशयीतांना ते सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी येथे पुढील कारवाईकामी घेऊन गेले. सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी येथे पोलीस हवालदार कांबळे यांनी सरकारी पक्षातर्फे फिर्याद दिली.
आखिफ मो. नजीर अहमद (वय-19 वर्षे, रा. घर नंबर 17/117 जे जे खान रोड, रायपेटा चेन्नई-14.) आणि समीर सलीम (वय-वीस वर्षे, रा. घर नंबर 2022/60, 2 स्ट्रीट माउंट रोड एलिफंट ट्रॅकेट चेन्नई-05.) अशी आरोपीतांची नांवे आहेत. या घटनेत महिला प्रवासीची लेडीज पर्स चोरीस गेली होती. त्या आरोपींनी महिला प्रवासी यांची लेडीज पर्स चोरून त्यातील मुद्देमाल काढून घेऊन पर्स तिथेच बाजूला टाकून दिले होती.
त्यात महिलाचा 5, 86, 010 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. त्यामध्ये महिला प्रवासी यांचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन, घड्याळ, रोख रक्कम, पाकीट रेल्वे तिकीट, मोबाईल चार्जर, हेडफोन असा मुद्देमालाचा समावेश आहे.
पोलीस अंमलदार कांबळे यांनी त्यांचे कर्तव्य संपवून निवासस्थानी जात असताना समय सूचकतेने व शिताफीने दोन आरोपींचा पाठलाग करून त्यांना मुद्देमालासह पकडून दिले आहे. कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यातर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.