सोलापूर : रस्ते अपघाताचा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असलेले पंचनाम्याचे कागदपत्र देण्यासाठी 15 हजार रूपयांची लाच मागून खाजगी इसमाकरवी ती स्वीकारलेल्या पोलीस हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे (वय-52 वर्षे) याला खाजगी इसमासह रंगेहाथ पकडण्यात आलंय. ही घटना शनिवारी बार्शी तालुक्यातील वैराग इथं घडलीय. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या खाजगी इसमासह हवालदाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय.
याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर ग्रामीण कडील वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 ऑक्टोबर 2024 रोजी दाखल असलेल्या रस्ते अपघाताचा तपास पोलीस हवालदार राहुल सोनकांबळे (बक्कल नंबर-565) यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्या अपघातात तक्रारदाराचे वडील गंभीर जखमी झाले होते.
त्या अपघाताचा इन्शुरन्स क्लेम करण्याकरिता अपघात पंचनाम्याच्या कागदपत्रांची तक्रारदारास नितांत गरज होती. ती कागदपत्रे देण्याकरिता पोलीस हवालदार सोनकांबळे यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यात 15 हजार रुपये लाच म्हणून देण्याचे तडजोडीअंती ठरले होते. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची पडताळणी करून पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी सापळा रचला होता. त्यात पोलीस हवालदार राहुल सोनकांबळे खाजगी इसमाकरवी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघे रंगेहात सापडले. मनोज किशोर वाघमारे (वय- 40 वर्ष, रा. सिद्धार्थनगर, वैराग) असं खाजगी इसमाचं नाव आहे. उभयतांविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आले.ही कामगिरी मार्गदर्शन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाखाली सापळा पथकाचे पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार, पोलीस अंमलदार- पोहवा/ श्रीराम घुगे, पोहवा/ प्रमोद पकाले, पोशि/ राजू पवार, चा.पोहवा/राहुल गायकवाड, (सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर) यांनी पार पाडली.
नागरिकांना आवाहन